सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आलेलं नाही, शिंदे सरकारला कुणी सुनावलं?
आपल्या भूमिकेशी सहमत होणाऱ्या लोकांवर सतत कारवाई करणे, संभ्रमाचं भयावह पद्धतीचं वातावरण निर्माण करणारं हे लोकशाहीला पूरक नाही, असं सुनिल तटकरे म्हणाले.
रत्नागिरीः सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आलेलं नाही. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारने हे लक्षात घेत मनमानी कारभार थांबवावा, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिलाय. आपल्या गटाच्या भूमिकेशी सहमत नसणाऱ्यांवर दडपशाही करणे हे लोकशाहीसाठी मारक असल्याचं तटकरे म्हणाले. आपले विचार मांडण्याचा सर्वांनाच अधिकार आहे, असंही तटकरे यांनी सुनावलं. रत्नागिरीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सुनिल तटकरे म्हणाले, ‘ सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आलेलं नाही. आपले विचार मांडण्याचा सर्वांनाच आहे. ज्या तत्परतेने जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित असताना याबाबतीत पोलिसांनी कारवाई अत्यंत अयोग्य होत आहे….
यापेक्षा उलट उत्कृष्ट संसदपटू खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अत्यंत हीन शब्दात, राज्याच्या एका विद्यमान मंत्र्याने काढलेले उद्गार महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहेत.
पाहा सुनिल तटकरे काय म्हणाले?
आश्चर्य म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याबाबत काहीच मत प्रदर्शित केलं नाही. खरं तर कारवाई व्हायचीच असेल तर याहीपेक्षा कडक कारवाई अब्दुल सत्तार यांच्यावर व्हायला पाहिजे, अशी भूमिका सुनिल तटकरे यांनी मांडली.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करणं ही सूडाची भावना आहे. प्रत्यक्षात या पद्धतीचं कृत्य करणारे मंत्री राज्याच्या सरकारमध्ये आहेत. ही कारवाई ताबडतोब झाली पाहिजे. राज्यातला कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारवर आहे. आपल्या भूमिकेशी सहमत होणाऱ्या लोकांवर सतत कारवाई करणे, संभ्रमाचं भयावह पद्धतीचं वातावरण निर्माण करणारं हे लोकशाहीला पूरक नाही, असं सुनिल तटकरे म्हणाले.