मुंबई : बालाजी कल्याणकर हे नांदेड जिल्ह्यातील एक उमदे नेतृत्व. ऐन तारुण्यातच त्यांना आमदारकीची लॉटरी लागली. अल्पावधीतच त्यांनी मिळालेल्या संधीचे सोनं केलं आणि आपल्या आमदारकीच्या अधिकारांचा जनतेच्या भल्यासाठी पुरेपूर वापर करण्याचा निर्धार केला. कल्याणकर हेसुद्धा मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचे मोठे झालेले. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबात जगण्याचा संघर्ष काय असतो, याची जाणीव बाळगून त्यांचा राजकीय प्रवास सुरु आहे. 42 वर्षीय बालाजी कल्याणकर हे 2017 मध्ये नांदेड-वाघेला महापालिकेचे नगरसेवक बनले. येथून त्यांचे राजकीय करिअर वेगाने वर झेपावले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्यांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे.
नगरसेवक झाल्यानंतर पुढील दोन वर्षांतच त्यांनी आमदारकीपर्यंत मजल मारली आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. 2019 मध्ये नगरसेवक असताना त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. त्यावेळी काँग्रेसचे दोन टर्म आमदार राहिलेले डी. पी. सावंत हे कल्याणकर यांच्याविरुद्ध रिंगणात उतरले होते. मात्र कमालीची जिद्द आणि संघर्षाची हिंमत असलेल्या कल्याणकर यांनी डी. पी. सावंत यांचा 12 हजार मतांनी पराभव केला. यातूनच कल्याणकर यांची ताकद किती मोठी आहे हे राजकीय वर्तुळात सिद्ध झाले.
कल्याणकर हे सुरुवातीपासूनच कट्टर शिवसैनिक म्हणून नावाजलेले होते. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांची छाप त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी एकनिष्ठ राहून एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिल्यांदा बंड केले. हिंदुत्वासाठी त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. यादरम्यान त्यांनाही प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. मात्र ते खचले नाहीत. त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेली साथ कायम ठेवली आहे. आमदारकीची त्यांची पहिली टर्म आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या पाठिशी मोठा तरुणवर्ग आहे. राजकारणातील यशस्वी प्रवासाचे हेच खरे गमक आहे, असे कल्याणकर मानतात.