“शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीला त्यांच्या संघटनेला एनडीएतून बाहेर काढले, आता तुमची उलटी गिनती सुरु”
शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढल्याच्या निर्णयावर (Saamana Editorial on BJP NDA) सडकून टीका करण्यात आली आहे.
मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढल्याच्या निर्णयावर (Saamana Editorial on BJP NDA) सडकून टीका करण्यात आली आहे. तसेच भाजपने शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीला (Saamana Editorial on BJP NDA) त्यांच्या संघटनेला एनडीएतून बाहेर काढले. आता भाजपची उलटी गिनती सुरु असं म्हणत शिवसेनेने थेट इशारा दिला. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात शिवसेना-भाजप असा संघर्ष पाहायला मिळणार का हे पाहावे लागणार आहे.
शिवसेनेने संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच मुंबईपासून दिल्लीपर्यंत आक्रमक पवित्रा घेत आंदोलने केली. त्यामुळे त्यांच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट होत आहे. आता भाजपच्यावतीने अधिकृतपणे शिवसेनेला एनडीएतून बाहेरचा रस्ता दाखवत विरोधी बाकावर बसवल्यानंतर शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे.
सामनात म्हटले आहे, “सारेजण विरोधात गेले असताना मोदी यांचा बचाव करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुखांच्या संघटनेला एनडीएतून बाहेर काढण्याचा मुहूर्त मिळाला. तोदेखील शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीस. स्वतःस हरिश्चंद्राचा अवतार मानणाऱ्यांनी हरिश्चंद्रासारखे वागावे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा आहे. तो अशा मंबाजींना साथ देणार नाही. आता मंबाजींच्या राजकारणाची उलटी गिनती सुरु झाली आहे. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कड्याकपाऱ्यांत फक्त एकच गर्जना घुमेल ‘शिवसेना जिंदाबाद’. हिंमत असेल, तर या अंगावर. आम्ही तयार आहोत.”
ज्या वाकडतोंड्याने शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याची घोषणा केली शिवसनेनेचे मर्म आणि एनडीएचे कर्म-धर्म माहीत नाही. तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या घुगऱ्या शिवसेनेने खाल्ल्या आहेत. एनडीएच्या जन्मकळा आणि बाळंतपणाच्या वेदना शिवसेनेने अनुभवल्या आहेत. भाजपच्या वाऱ्यालाही कुणी उभं राहायला तयार नव्हतं. हिंदुत्व, राष्ट्रवाद या शब्दांना देशाच्या राजकारणात कुणी विचारत नव्हतं. तेव्हा आणि त्याआधीही जनसंघाच्या पणतीत तेल ओतण्याचे काम शिवसेनेने केलं. शिवसेनेला बाहेर काढणाऱ्यांनी हा इतिहास समजावून घ्यावा, असंही सामनातून सांगण्यात आलं आहे.