रोहित पाटील यांनी मैदान मारलेली कवठेमहांकाळची निवडणूक वादात; विरोधकांची न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील (Rohit Patil) यांच्यामुळे राज्यभर गाजलेल्या कवठेमहांकाळ (Kavathe Mahankal) नगरपंचायत निवडणुकीत मयत व्यक्तींच्या नावे मतदान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील (Rohit Patil) यांच्यामुळे राज्यभर गाजलेल्या कवठेमहांकाळ (Kavathe Mahankal) नगरपंचायत निवडणुकीत मयत व्यक्तींच्या नावे मतदान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. बनावट मतदानाविरुद्ध पराभूत उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतलीय. माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील याच्या राजकारणातील आगमनाने कवठेमहांकाळची निवडणूक गाजली होती. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे स्वतंत्र पॅनल लावणाऱ्या रोहित पाटील यांच्या विरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवली. यात रोहित पाटील यांनी मोठया चुरशींने 17 पैकी 10 जागा जिंकत बाजी मारली. ही निवडणूक रोहित पाटील यांच्या पॅनलने ही निवडणूक जिंकल्यामुळे या निवडणुकीची राज्यभरात चर्चा झाली होती. विरोधी शेतकरी पॅनेलला केवळ 6 जागांवरच समाधान मानावे लागले आणि 1 अपक्ष निवडून आला आहे. मात्र, राज्यभर गाजलेल्या या कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत मयत व्यक्तींच्या नावे मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तीन प्रभागांमध्ये दुबार मतदान झाल्याची तक्रार करण्यात आलीय.
पराभूत उमदेवारांची न्यायालयात धाव
कवठेमहांकाळ नगरपंचायत मधील प्रभाग 10 आणि 16 मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बनावट मतदानाविरुद्ध पराभूत उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत मधील प्रभाग 10 मध्ये 7 मयत व्यक्तीच्या नावे बनावट मतदान झाले आहे. प्रभाग 16 मध्ये मयत, दुबार, चुकीचे असे 13 बनावट मतदान झाल्याचे समोर आले आहे. बनावट मतदान झाल्याने शेतकरी विकास आघाडी व आरपीआय च्या उमेदवारांचा निसटता पराभव झाला होता.यामुळे प्रभाग 10 आणि 16 मध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची निवड रद्द करावी, यासाठी जिल्हा न्यायालयात पराभूत उमेदवारांनी तक्रार दाखल केल्याची ॲड. अमित शिंदे यांनी माहिती दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
कवठेमंकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये शेतकरी विकास आघाडी तर्फे उमेदवारी करणाऱ्या उदय शिवाजीराव शिंदे यांनी निवडून आलेले उमेदवार अब्दूलहमीद ब्रदुद्दीन शिरोळकर यांची निवड रद्द करण्याची मागणी केलेली आहे. प्रभाग क्रमांक दहा मध्ये 7 मयत व्यक्तींची नावे मतदार यादीतून कमी केली नसल्याचा गैरफायदा घेऊन सात मयत व्यक्तींच्या नावे बनावट मतदान झालेले आहे. ही बनावट सात मते मिळाल्यामुळे शिरोळकर विजय झाले आहेत. पराभूत उमेदवार शिंदे यांचा केवळ दोन मतांनी निसटता पराभव झाला आहे. या मयत मतदानामध्ये निवडून आलेले उमेदवार शिरोळकर यांचे मयत वडील व दोन चुलते यांच्या नावाने देखील बनावट मतदान झाले आहे. ज्या मयत व्यक्तींच्या नावे बनावट मतदान झाले आहे त्यांच्या मुलांनी न्यायालयामध्ये शपथपत्र घालून उदय शिंदे यांच्या म्हणण्याला पुष्टी दिली आहे. त्यामुळे प्रभाग 10 ची निवडणूक रद्द होऊन शेतकरी विकास आघाडीचे उदय शिंदे यांची विजयी उमेदवार म्हणून घोषणा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
प्रभाग क्रमांक 16 मधील आरपीआयचे उमेदवार नानासाहेब सदाशिव वाघमारे यांनी विजयी उमेदवार संजय विठ्ठल वाघमारे व इतर पराभूत उमेदवार यांचे विरुद्ध दाद मागितली आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये 3 मयत व्यक्तींचे नावे बनावट मतदान झाले आहे. तसेच तीन व्यक्तींची प्रभाग 16 च्या मतदार यादी मध्ये दुबार नावे आली असून त्यांनी त्या दोन्ही ठिकाणी मतदान केले आहे. तसेच पुरुषाच्या ठिकाणी स्त्री चे फोटो, स्त्रीच्या ठिकाणी पुरुषाचा फोटो अशी 4 चुकीची नावे असतानादेखील त्याच्या नावावर बनावट मतदान झाले आहे. असे एकूण 13 बनावट मतदान झाले असून नानासाहेब वाघमारे यांचा केवळ नऊ मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक रद्द करून नानासाहेब वाघमारे यांना विजय घोषित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दोन्ही तक्रारींमध्ये बनावट मतदानाचा सबळ पुरावा हजर केलेला असून निवडणूक निर्णय, अधिकारी, कवठेमंकाळ चे मुख्याधिकारी यांनादेखील याकामी पक्षकार केले आहे. निवडणुकीमध्ये दुबार, मयत व चुकीचे मतदान रोखण्यासाठी पडताळणीची तरतूद असताना देखील त्याकडे गांभीर्याने न पाहिल्याने निवडणूक सदोष झालेली असल्याने तिला न्यायालयात आव्हान दिले असल्याचे तक्रारदारांचे वकील अमित शिंदे यांनी सांगितले.
एकंदरीत पाहता कवठेमहाकाळ नगरपंचायत निवडणुकीत मृत माणसांच्या नावे मतदान केले मुळे जिवंत उमेदवारांचा विजय निश्चित झाला आहे. मृत मतदारांनी या निवडणुकीत मतदान केल्यामुळे जिवंत उमेदवाराचा विजयाचा मार्ग सोपा आणि सरळ मोकळा झाला आहे. आता यावर कोर्ट काय निर्णय घेणार या कडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागून राहिले आहे. आता या धक्कादायक प्रकारामुळे कवठेमहांकाळ नगरपंचायत ही निवणूक पुन्हा चर्चेत आली आहे
कडेगाव नगरपंचायतीमध्ये दुबार मतदानाची तक्रार
कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सत्तातर होऊन या ठिकाणी भाजप चे पृथ्वीराज देशमुख यांच्या पॅनेलने राज्याचे कृषिराज्य मंत्री विश्वजित कदम यांच्या पॅनेल चा धक्कादायक पराभव केला होता. भाजपने या निवडणुकीत 17 पैकी 11 जागा जिकून बाजी मारली होती. विश्वजित कदम यांच्या कॉग्रेसच्या पॅनेलला 5 जागा जिंकता आल्या आहेत. कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत 3 प्रभागांमध्ये दुबार मतदान झाल्याची तक्रार आहे. प्रभाग 13, 14 व 17 मध्ये भाजपच्या चिन्हावर निवडूण आलेल्या उमेदवारांची निवड रद्द करून काँग्रेस उमेदवारांना विजयी घोषित करावे यासाठी उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
इतर बातम्या:
सोमय्या-राऊत वादावर बोलणार नाही, मी लहान कार्यकर्ता, मुश्रीफांचा कुणाला टोला?