चौकशी रोहित पवार यांची, भिडले संजय राऊत आणि चंद्रशेखर बावनकुळे, वर्षभरात कुणा कुणाला आल्या नोटीस?
निवडणूका तोंडावर असताना फक्त दबावासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाया होतायत असा आरोप होतोय. सत्ताधारी हे सगळे आरोप खोटे ठरवत आहेत. त्यामुळे मागच्या वर्षभरात किती जणांमागे चौकशीचा फेरा लागला? त्यावरून काय आरोप प्रत्यारोप झाले ते पाहू
मुंबई | 25 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांच्यानंतर आता पुन्हा ठाकरे गटामागे चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. कथित खिचडी घोटाळ्याच्या आरोपात संजय राऊतांचे बंधू संदीप राऊत यांना ED चं समन्स गेलंय. तर दुसऱ्या एका कथेत कोरोना बॉडी बँग घोटाळ्यात ठाकरे गटाच्याच किशोरी पेडणेकरांना हजेरीसाठी बोलावलं गेलंय. विरोधी गटातल्या नेत्यांमागे सध्या चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. त्यावरून गेल्या वर्षभरात ज्या ज्या कारवाया झाल्यात आणि त्यावरून विरोधकांनी भाजपच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलाय. त्याला उत्तर देताना ‘जर कर नसेल तर डर कशाला’, अशी भूमिका भाजपनं मांडली आहे.
8 जानेवारी 2023 ला ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची बेहिशोबी संपत्तीच्या आरोपामध्ये चौकशी झाली. याच आरोपाखाली 18 जानेवारीला आमदार नितीन देशमुख यांची चौकशी झाली. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांनी शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे पुण्यातील अनिरुद्ध देशपांडे यांच्यावर आयकराचा छापा पडला.
2022 मध्ये ED चे समन्स मिळालेले ठाकरे गटाचे राहुल कणाल 1 जुलै 2023 ला शिंदे गटामध्ये सामील झाले. 29 जुलैला ठाकरे गटाचे नेते मंगेश सातमकर यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश झाला. त्यांच्यावर एका तरुणीनं लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र, गैरसमजातून आरोप झाल्याचा दावा करत तरुणीने नंतर तक्रार मागे घेतली. योगायोगानं त्याच दिवशी सातमकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला.
13 ऑगस्टला शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांच्या बंधूंना ED ची नोटीस गेली. 18 ऑगस्टला राजमहाल लकीचंद ज्वेलर्सचे मालक ईश्वरलाल जैन यांच्याकडे आयकराचा छापा पडला. शरद पवार गटामध्ये असल्यामुळे कारवाई झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. 20 सप्टेंबरला कथित खिचडी घोटाळ्यामध्ये ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांची चौकशी झाली.
1 ऑक्टोबरला धुळ्यामधले काँग्रेसचे आमदार कुनाल पाटील यांच्या सूतगिरणीवर आयकर विभागानं छापा टाकला. एक दिवस आधीच नाना पटोलेंनी कुडाळ पाटलांकडे विदर्भातल्या तीन मतदार संघाची जबाबदारी सोपवल्यानं दुसऱ्या दिवशी छापा टाकण्यात आला आणि त्यावरून आरोपही झाले होते.
10 नोव्हेंबर बीडमध्ये कुटे ग्रुपवर आयकराचा छावा पडला. योगायोगानं महिनाभरात कुटेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून देखील आरोप झाले. 13 ऑक्टोंबरला पनवेलमध्ये माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर कथित बँक घोटाळ्याच्या आरोपामध्ये ED ची कारवाई झाली. 15 नोव्हेंबरला ठाकरे गटाचे नाशिकमधले नेते अद्वैत हिरेंना आठ वर्ष जुन्या केसमध्ये आर्थिक फसवणुकीच्या आरोपात अटक झाली.
17 डिसेंबरला ठाकरे गटाचे नाशिकमधलेच नेते सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात पंधरा वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात पदाच्या गैर वापराच्या आरोपात गुन्हा दाखल झाला. नंतर 5 जानेवारीला रोहित पवारांच्या कंपन्यांवर ED चे छापे पडले. 9 जानेवारीला मुंबईतील ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वाईकरांच्या घरावर ED च्या धाडी पडल्या.
17 जानेवारीच्या रात्री ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांना कथित खिचडी घोटाळ्यामध्ये ED नं अटक केली. 18 जानेवारीच्या सकाळी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घर आणि कार्यालयाची ACB नं चौकशी केली. 24 जानेवारीला रोहित पवार ED चौकशीसाठी हजर राहिले. त्यानंतर कथित खिचडी घोटाळ्याच्या आरोपात संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत यांना ED चं समन्स गेलं. तर 25 जानेवारीला ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांनाही चौकशीसाठी बोलावल.
विरोधकांमागे लागलेल्या चौकशीच्या फेऱ्यामुळे संजय राऊत संतापले. काय चाललंय राज्यामध्ये काय मोगलाई आहे का? मोदींचं राज्य आहे की औरंगजेबाचं राज्य आहे, अशी टीका त्यांनी केली. आम्ही गुडघे टेकणारे लोकं नाही आहोत. पण काही हरकत नाही. आमच्या घरातले लोकं जातील, उभे राहतील ठामपणे का हवं ते करा, लढाई आमच्याही शहाने लढा ना तुम्ही हिंमत आहे तर, ना मर्द आहेत तुम्ही असे आव्हानही त्यांनी दिलं.
संजय राऊत यांच्या या आव्हानाला उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुम्ही स्वतःला स्वच्छ समजता. तर मग चौकशीला सामोरं जायला घाबरता का तुम्ही? फक्त हे ED च्या आलेल्या समस्यावर ED वर आरोप करायचे. मग केंद्र सरकारवर आरोप करायचे. राजकारणाच्या भूमिकेतून कारवाई होतीत आरोप करायचे. मला वाटतं आपण जर शेण खाल्लं नसेल. तर आपण घाबरण्याचं कारण नाही ना असा टोला त्यांनी लगावला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दलही कट कारस्थान रचलं गेलं. प्रवीण दरेकरांनाही जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. नारायण राणे साहेबांना जेवता जेवता पोलिसांनी उचललं. काय केलं तुम्ही? तुम्ही याठिकाणी सत्तेचा दुरुपयोग केला. तसं आम्ही नाही करत आहे. तुम्हाला कोणी जेलमध्ये टाकलं का? तुम्हाला नोटीस आली आहे. ही नोटीस काय एकटा रोहित पवारला नाही. अनेकाला नोटीस जात असतं असे म्हणत विरोधकांना उत्तर दिलंय.