Arvind Sawant : शायना एनसी संदर्भात माल म्हणण्यावर अरविंद सावंतांच स्पष्टीकरण, म्हणाले….
Arvind Sawant : "महिलेला माल म्हणून तुम्ही बघता. एक सक्षम महिला, प्रोफेशनल 20 वर्ष स्वबळावर काम करुन पुढे आली आहे. तुम्ही तिच्यासाठी माल सारखे शब्द वापरता. तुमची मानसिक स्थिती त्यातून सगळ्यांना कळते" असं शायना एनसी म्हणाल्या.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्या एका वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. अरविंद सावंत यांनी बोलताना एका वाक्यात माल हा शब्द उच्चारला. त्यावरुन शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांना सुनावलं आहे. अरविंद सावंत यांनी वापरलेला माल हा शब्द शायना एनसी यांनी स्वत:सोबत जोडला. आता या सर्व वादात अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “50 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीत माझ्या क्षेत्रात माझ्या इतका स्त्रियांचा बहुमान करणारा माणूस तुम्हाला मिळणार नाही. मी माझ्या आयुष्यात कधीच कोणाबद्दल अवमानकारक शब्द वापरत नाही. ते हिंदीतल वक्तव्य होतं. माल या शब्दाचा इंग्रजीत अर्थ Goods असा होतो. मराठीत तुम्ही त्याचा काहीही अर्थ काढू शकता” असं अरविंद सावंत म्हणाले.
“शायना एनसी माझी जुनी मैत्रीण आहे, शत्रु नाही. फॉर्म भरल्यानंतर त्या आता दोन दिवसांनी बोलत आहेत. त्यांना हे नरेटिव्ह सेट करायला कोणी शिकवलं. मी त्यांनाच नाही, माझ्या उमेदवाराला सुद्धा बोललो, हा ओरिजनल माल आहे. हे लक्षात घ्या, अर्धवट बोलू नका. माल या शब्दाचा अर्थ वेगळा काढण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे, त्यात त्या यशस्वी होणार नाहीत. सरड्यासारखा माणूस रंग बदलतो. पायाखालची वाळू सरकलीय. असा कुठल्यातरी शब्दाचा अर्थ काढायचा, तर असं आता होणार नाही” असं अरविंद सावंत म्हणाले.
‘त्यांना विचार ते कुठले आहेत?’
“हे तेच अरविंद सावंत आहेत, ज्यांच्यासाठी मी प्रचार केला. आमच्या बळावर निवडून आले. त्यांना विचार ते कुठले आहेत?. मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईची लाडली आहे. मुंबईसाठी काम करणार. मला अरविंद सावंत आणि उबाठाच्या प्रमाणपत्राची गरज नाही” असं शायना एनसी यांनी ठणकावलं.
‘माल बोलाल, तर हाल होणार’
“महिलेला माल म्हणून तुम्ही बघता. एक सक्षम महिला, प्रोफेशनल 20 वर्ष स्वबळावर काम करुन पुढे आली आहे. तुम्ही तिच्यासाठी माल सारखे शब्द वापरता. तुमची मानसिक स्थिती त्यातून सगळ्यांना कळते. महाराष्ट्रातील महिला उबाठाला मतदान करणार नाही. महिलाचा सन्मान केला, तर आदर आहे. महिलांना माल बोलवलं, तर तुमचे जे हाल होणार ते 20 तारखेला बघा” असं शायना एनसी म्हणाल्या.