अधिकाऱ्याने लाच मागताच त्याने चक्क कपडेच काढून दिले; ‘या’ शहरातील आरटीओमध्ये घडला अजबप्रकार
कडेगाव तालुक्याला भ्रष्ट्राचाराचा भस्मासूर लागला असून 2 दिवसापूर्वीच एक भ्रष्ट तलाठी लाचलूचपतच्या जाळ्यात अडकला होता. मात्र भ्रष्टाचार काही थांबण्याचे नाव घेत नाही.
शंकर देवकुळे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सांगली: भ्रष्टाचाराने (corruption) आपल्या देशाला अक्षरश: पोखरून काढलं आहे. ऑफिस मोठं असो की छोटं, प्रत्येक ठिकाणी लाच मागितली जाते. छोट्या छोट्या गोष्टींसाठीही लोकांची अडवणूक केली जाते. त्यामुळे लोक अक्षरश: वैतागून गेले आहेत. अनेकदा तर लोकांच्या संतापाचा कडेलोट होत असतो. सांगलीतील (sangli) कडेगाव येथेही असाच एका कर्मचाऱ्याच्या संतापाचा कडेलोट झालेला पाह्यला मिळाला. कडेगाव येथे आरटीओ कार्यालयातील (rto office) अधिकाऱ्याने एका व्यक्तिला लाच मागितली. या व्यक्तीकडे खायला पैसे नव्हते. तो लाच कुठली देणार? मग त्याने चक्क अंगावरची कपडे काढून अधिकाऱ्याला दिले. लाचच्या बदल्यात कपडे घ्या, पण माझं काम करा, असा टाहोच त्याने फोडला. या अजबप्रकारामुळे आरटीओ अधिकाऱ्याच्या तोंडचेच पाणी पळाले असून या प्रकाराची जिल्ह्यात चांगलीच चर्चा सुरू आहे.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात एका व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे आरटीओ कॅम्पमधील. गाडी पासिंगसाठी लाच मागितल्या नंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क आपले कपडेच काढून अधिकाऱ्याला देत आंदोलन केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
वाहन पासिंग करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. लाच मागितल्या नंतर चक्क आपले कपडे काढून देत कडेगावमधील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांनी हे अनोखे आंदोलन केले.
दरम्यान कडेगाव येथे भ्रष्ट आरटीओ अधिकाऱ्याचा हार घालून सत्कार केला. यावेळी आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ, वंचितचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष जीवन करकटे, शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष विजय माळी उपस्थित होते. यावेळी अनेक संघटनांनी एकत्र येऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
कडेगाव तालुक्याला भ्रष्ट्राचाराचा भस्मासूर लागला असून 2 दिवसापूर्वीच एक भ्रष्ट तलाठी लाचलूचपतच्या जाळ्यात अडकला होता. मात्र भ्रष्टाचार काही थांबण्याचे नाव घेत नाही. कडेगाव तालुक्यात आरटीओ कॅम्पच्या वेळी मोठा भ्रष्टाचार होत असून एजंटच्या माध्यमातून गेले तरच काम होते. अन्यथा लाचेची मागणी केली जाते.
लायसन्स काढण्यासाठी गेल्यावर किंवा गाडी पासिंग असो यावेळी त्या फाईलवर एजंटचे नाव वरती पेनाने लिहिल्याचे सर्रास दिसून ये आहे. हा भ्रष्टाचार थांबणार कधी हा प्रश्न पडत असून सर्वसामान्य नागरिकांची यात पार पिळवणूक होत आहे, असं सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांनी सांगितलं.