मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajyasabha Election) मतदान सुरू झालं आहे. गेल्या दीड तासात आतापर्यंत 144 आमदारांनी मतदान केलं आहे. अजूनही अनेक आमदार मतदान करण्याचे बाकी आहेत. त्यामुळे येत्या दोन चार तासात मतदानाची प्रक्रिया पार पडणार असल्याचं चित्रं आहे. मात्र, मतदान सुरू होताच अफवांचे पेवही उठलं आहे. राष्ट्रवादी (ncp) आणि काँग्रेसने (congress) मतांचा कोटा वाढवल्याचं भाजपकडून सांगितलं जात आहे. तर रावसाहेब दानवे यांचा मुलगा आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. आमदार फुटत नसल्याने त्यांच्या संभ्रम निर्माण करण्याची खेळी यामागे असल्याचं सांगितलं जात आहे. पण त्याला आमदार बळी पडतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या अफवा कितीही पसरत असल्या तरी संध्याकाळी निकाल लागेल तेव्हाच कुणाकडे किती मते आहेत हे स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
आज सकाळी 9 वाजता राज्यसभेसाठी मतदान सुरू झालं आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर रात्री 8 पर्यंत राज्यसभेचं संपूर्ण चित्रं स्पष्ट होईल. मात्र, आज सकाळी मतदान सुरू होताच भाजपचे राज्यसभेचे उमेदवार अनिल बोंडे यांनी एक माहिती देऊन खळबळ उडवून दिली आहे. आघाडीमध्ये प्रत्येकी 42 मतांचा कोटा ठरला होता. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हा कोटा ऐनवेळी वाढवून 44 केला आहे, असा दावा अनिल बोंडे यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही खबर वाऱ्यासारखी पसरली. ती इतकी की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्याची दखल घेतल्याचं सांगितलं जातं. मुख्यमंत्र्यांनी यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जाब विचारल्याचं सूत्रांनी सांगितलं.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मतांचा कोटा वाढवल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. भाजपकडून ही माहिती देण्यात आल्याचं शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना पत्रकारांनी विचारलं. त्यावर, या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही. स्वत: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा आमदार मुलगा माझ्या संपर्कात आहे, असं अब्दुल सत्तार यांनी सांगून एकच खळबळ उडवून दिली. त्यामुळे चर्चांचा ओघ दुसरीकडे वळला.
भाजपचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. आम्हाला कोट्यापेक्षा एक एक मत अधिक मिळेल. तसंच नियोजन करण्यात आलं आहे. त्यानुसारच मतदान होणार आहे, असं त्यांनी सांगितलं. एमआयएमने शिवसेनेला पाठिंबा दिल्याची अफवा आहे. त्यांना मतदानाचा अधिकार आहे. कुणाला मतदान करायचं हे त्यांचे आमदार ठरवतील. वाटून दिलेल्या कोट्याप्रमाणे नियोजन होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.