Rupali Patil on Thackeray : हिंदूहृदयसम्राटांच्या दोन्ही लेकरांनी एकत्र यावं, रुपाली पाटलांची मागणी, ठाकरे बंधू एकत्र येणार? सध्याची परिस्थिती काय?
शिंदे गटामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झालेली असताना, शिंदेंचा राज ठाकरेंना आलेला फोन आणि दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याचं केलेलं आवाहन प्रचंड विरोधाभास असल्याचं दिसतंय. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी ही आगळीच मागणी केलीय.
मुंबई : राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी एक आगळीच मागणी केलीय. राज्याच्या राजकारणात सतत एकमेकांवर टीका करणाऱ्या दोन दिग्गज ठाकरे बंधुंना एकत्र येण्याचं आवाहन पाटील यांनी केलंय. एकीकडे राज्यातील घडामोडींना वेग आलाय. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष वाढतोय. बंडखोर शिंदे (Ekanth Shinde) गट आणि ठाकरे विरुद्ध सत्तासंघर्ष पेटलाय. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) देखील बंडखोरांना दिलासा दिला असून ठाकरे सरकारला हा आणखी एक धक्का मानला जातोय. राज्यात कधीही सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो आणि महाविकास आघाडी सरकारला कधीही अल्पमतात येऊ शकतं. अशी स्थिती आहे. अशातच आता रुपाली ठोंबरे-पाटील यांनी केलेल्या मागणीची प्रचंड चर्चा रंगली आहे. अशा अडचणीच्या परिस्थितीत ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याचं केलेलं आव्हान चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
रुपाली पाटील नेमकं काय म्हणाल्या?
राज्यातील सत्तासंघर्षावर बोलताना राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील म्हणाल्या की, ‘हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाची अस्मिता टिकवण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या दोन्ही लेकरांनी एकत्र यावं, ही माझी इच्छा आहे, असं विधान मनसेच्या माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी केलं आहे. राज्यात सध्या जी परिस्थिती आहे ती नेमकी कुणामुळे आहे. त्यात नेमका कुणाचा दबाव आहे. कोण सत्तेसाठी काय करत आहे. हे आता वारंवार सांगण्याची गरज नाही. असं सांगत रूपाली ठोंबरे-पाटील यांनी नाव न घेता भाजपावर देखील टीका केली. ज्यावेळी भगवान रामांना वनवासात जायची वेळ आली होती. त्यावेळेस त्यांचा भाऊ लक्ष्मण सगळं सोडून त्यांच्यासोबत गेले होते.आता देखील राम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी एकत्र येणे गरजेचं आहे असं सांगत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावी अशी इच्छा देखील रुपाली ठोंबरे-पाटील यांनी व्यक्त केली आहे.
ठाकरे बंधू एकत्र येणार?
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू सतत या न त्या कारणावरुन एकमेकांवर टीका टिप्पणी करताना दिसतात. यामुळे दोन्ही बंधू एकत्र येण्याचं रुपाली ठोंबरे पाटील यांनी मांडलेलं मत सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अशक्यचं असल्याचं जाणकार सांगतात.
शिंदेंचा राज ठाकरेंना फोन
बंडखोर एकनाथ शिंदे यांनी दोनदा राज ठाकरेंना फोन केल्याची माहिती आहे. शिंदे गटामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झालेली असताना शिंदेंचा राज ठाकरेंना आलेला फोन आणि दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याचं केलेलं आवाहन हे सध्यातरी प्रचंड विरोधाभास असल्याचं दिसतंय. दरम्यान, येत्या काळात काय होतं, ते पहाणं मगत्वाचं ठरेलं.