सात जणांची माघार, आता ‘या’ 6 उमेदवारांविरोधात ऋतुजा लटके यांची लढत
मातब्बर उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतल्याने ही निवडणूक एक औपचारिक ठरणार आहे. त्यामुळे ऋतुजा लटके किती मतांच्या फरकाने विजयी होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (murji patel) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. ऋतुजा लटके (rutuja latke) यांना या निवडणुकीला सामोरे जावं लागणार आहे. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुरजी पटेल यांच्यासह सात जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतरही अजूनही सहाजण निवडणूक (election) रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक होणार आहे. मात्र, निवडणूक होणार असली तरी ऋतुजा लटके यांचा विजय सोपा मानला जात आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या शिवाय अपक्ष उमेदवार निकोल अल्मेडा, साकिब जफर ईमाम मल्लिक, चंद्रकांत रंभाजी मोटे, पहल सिंग धनसिंग आऊजी, चंदन चतुर्वेदी आणि हिंदुस्थान जनता पार्टीचे उमेदवार राकेश अरोरा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
तर, ऋतुजा यांची लढत इतर सहा जणांविरोधात होणार आहे. आपनी आपनी पार्टीचे बाला व्यंकटेश विनायक नाडार, राईट टू रिकॉल पार्टीचे मनोज श्रावण नायक, अपक्ष उमेदवार नीना खेडेकर, फरहाना सिराज सय्यद, मिलिंद कांबळे आणि राजेश त्रिपाठी आदी उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मतदान होणार आहे.
सहा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असल्याने ऋतुजा लटके यांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. प्रचारही करावा लागणार आहे. मात्र, भाजपने माघार घेतल्याने या निवडणुकीतील चुरस संपली आहे. त्यामुळे लटके यांना प्रचारासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार नाही. मतदारांपर्यंत आपलं चिन्हं पोहचावं या उद्देशाने त्यांना प्रचार करावा लागणार आहे.
मातब्बर उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतल्याने ही निवडणूक एक औपचारिक ठरणार आहे. त्यामुळे ऋतुजा लटके किती मतांच्या फरकाने विजयी होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.