“कितीही कट-कारस्थानं करा, बेइमानीचे घाव घाला, शिवसेना संपणार नाही!”, सामनातून शिंदे गटाला इशारा
आजच्या सामनातून शिंदेगटावर निशाणा साधण्यात आलाय. शिवसेनेच्या पुढच्या भविष्यबाबतही भाष्य करण्यात आलंय.
मुंबई : धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर काल संध्याकाळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. आज ठाकरे आणि शिंदेगटाच्या निवडणूक चिन्हासंदर्भात निर्णय येण्याची शक्यता आहे. त्याआधी आजच्या सामनातून शिंदेगटावर (Ekanth Shinde) निशाणा साधण्यात आलाय. शिवसेनेच्या पुढच्या भविष्यबाबतही भाष्य करण्यात आलंय.”कितीही कट-कारस्थानं करा, बेइमानीचे घाव घाला, शिवसेना संपणार नाही!”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.
“कोणी कितीही कट-कारस्थाने केली, बेइमानीचे घाव घातले तरी शिवसेना संपणार नाही. ती पुन्हा जन्म घेईल , झेपावेल , उसळेल , दुष्मनांच्या नरडीचा घोट घेईल . निवडणूक आयोगाने आता शिवसेनेचे ‘ धनुष्यबाण ‘ हे चिन्ह गोठवले आणि ‘ शिवसेना ‘ हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई करणारा अंतरिम आदेश काढला . दिल्लीने हे पाप केले . बेइमान गारद्यांनी आईशीच बेइमानी केली ! आम्ही शेवटी इतकेच सांगतो , कितीही संकटे येऊ द्या , त्यांच्या छाताडावर पाय देऊन आम्ही उभे राहूच!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी छपन्न वर्षांपूर्वी मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी एक वन्ही चेतवला, हिंदुत्वाच्या समिधा टाकून त्याचा वणवा केला. आज त्या शिवसेनेचे अस्तित्व संपविण्यासाठी याच महाराष्ट्राच्या मातीतील एकनाथ शिंदे व त्याचे चाळीस भामटे दिल्लीचे गुलाम झाले, असं म्हणत शिंदेगटावर निशाणा साधण्यात आला आहे.
रक्त आणि त्यागातून बहरलेल्या शिवसेनेस संपवणे कुणालाच जमले नाही, तेव्हा एकनाथ शिंदे या गारद्याची नेमणूक त्याकामी झाली. तैमूरलंग, चंगेजखान आणि औरंगजेब यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे आणि इतर गारद्यांनी दुष्टपणा केला. एकनाथ शिंदे हे गारद्यांचे सरदार आहेत. असा दानव हिंदुस्थानच्या इतिहासात पाच हजार वर्षांत झाला नसेल, अशा शब्दात शिंदेंवर टीका करण्यात आली आहे.