मुंबई : चीनची साम्राज्यवादाची राक्षसी भूक पाहता हिंदुस्थानला आता गाफील राहून चालणार नाही. अरुणाचलपासून लडाखपर्यंत चिनी उंदरांनी सीमा कुरतडण्याचा उद्योग सुरु केला आहे. चार किलोमीटरपर्यंत घुसखोरी करायची आणि चर्चेच्या फेऱ्यांत अडकवून दोन किलोमीटर माघार घ्यायची अशी बदमाशी चीनने सुरु केली आहे. सैन्याची संपूर्ण माघार झालेली नसताना चीनने लढाऊ विमानांसह सीमेवर सुरु केलेला युद्धसराव म्हणजे धोक्याची पूर्वसूचना आहे. भारतीय सैन्याची चीनच्या प्रत्येक हालचालीवर नजर असली तरी धोकेबाज चीनच्या कपटनीतीवरही लक्ष ठेवावेच लागेल, असा सल्ला सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) मोदी सरकारला देण्यात आला आहे. (Saamana Editorial warning Modi Government Over India China Border Issue)
कपटनीती आणि कावेबाजपणा हा चीनच्या परराष्ट्र धोरणाचा पाया आहे हे आजवर अनेकदा सिद्ध झाले. एकीकडे चीन मैत्रीचा हात पुढे करून शांततेची बोलणी करतो आणि दुसरीकडे पाठीत खंजीर खुपसून विश्वासघात करतो. याचे अनेक कटू अनुभव आपल्या गाठीशी आहेत. तरीही आपण पुनः पुन्हा चीनवर विश्वास ठेवतो आणि प्रत्येक वेळी चीनकडून दगाबाजी होते. आताही तसेच घडताना दिसत आहे.
हिंदुस्थान-चीनच्या सरहद्दीवरून येणाऱ्या ताज्या बातम्या पाहता चीनचे इरादे काही स्वच्छ दिसत नाहीत. लडाखच्या सीमा भागात चीनने नव्या कुरापती सुरु केल्या असून, तिथे चिनी सैन्याच्या कारवाया झपाट्याने वाढताना दिसत आहेत. हिंदुस्थानच्या सीमेजवळ चीनने अचानक युद्धसराव सुरु केला आहे. उभय देशांमध्ये शांततेची बोलणी सुरु असताना आणि सीमेवर संघर्ष वाढणार नाही याची काळजी घेण्याचा शब्द दोन्ही देशांनी एकमेकांना दिला असताना चीनने सुरु केलेला हा युद्धसराव चिथावणीखोरच म्हणावा लागेल.
लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या घुसखोरीनंतर गतवर्षीच्या जून महिन्यात हिंदुस्थान-चीनच्या सैनिकांमध्ये जबरदस्त संघर्ष झाला. त्या धुमश्चक्रीत हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले. चीनचेही अनेक सैनिक मारले गेले. त्यानंतर जवळपास आठ महिने दोन्ही देशांचे सैन्य सीमेवर आमने-सामने उभे ठाकले होते. संबंध इतके ताणले गेले की, हिंदुस्थान-चीनमध्ये कधीही युद्धाचा भडका उडेल असे वातावरण निर्माण झाले होते. अशा स्फोटक परिस्थितीतच चीनने शांततेची बोलणी सुरु केली. लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या आणि चार महिन्यांपूर्वी उभय देशांत सैन्य माघारीचा समझोता झाला.
चीनने आपल्या हद्दीत अनेक किलोमीटर घुसखोरी करून मोठा लष्करी तळच उभा केला होता. तब्बल 50 हजार चिनी सैनिकांनी पूर्व लडाखच्या सीमा भागात शिरकाव केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थाननेही 50 हजार सैनिक तैनात केले होते. सैन्याची ही सगळी जमवाजमव मागे घेण्याचे ठरल्यानंतर पेंगाँग सरोवर आणि लडाखच्या सीमा भागातून दोन्ही देशांच्या सैन्यांची माघार सुरू झाली होती. शांतता बोलणीची 12 वी फेरी सुरू होण्यापूर्वी चिनी सैनिकांची संपूर्ण माघार अपेक्षित असताना चीनने पुन्हा तिरकी चाल खेळत काही महत्त्वाच्या ठिकाणांवर अजूनही आपले सैनिक जैसे थे ठेवले आहेत.
मे महिन्यात तर चीनने एकीकडे कोरोनाशी लढण्यासाठी भारतापुढे मदतीचा हात देऊ करण्याची भाषा केली आणि दुसरीकडे त्याच महिन्यात पूर्व लडाखमध्ये पुन्हा एकदा घुसखोरी केली. केवळ घुसखोरी करूनच चिनी सैनिक थांबले नाहीत, तर निवासाच्या दृष्टीने पक्के बांधकाम करून एक डेपोही चिन्यांनी तिथे उभारला. त्यामुळे हिंदुस्थान-चीन सीमेवर पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली.
आता तर चीनने गेले काही दिवस जाणीवपूर्वक सीमेवर युद्धसराव सुरु केला आहे. पूर्व लडाखला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या हवाई हद्दीत चिनी हवाई दलाच्या तब्बल 24 लढाऊ विमानांनी या युद्धसरावात भाग घेतला आहे. चिनी सैनिकांनी सुरू केलेला युद्धसराव त्यांच्या हद्दीत असला तरी तो हिंदुस्थानी सीमेलगत आहे. चीनने अशी बेडकी फुगवल्यानंतर हिंदुस्थानी लष्करानेही आता आपल्या हद्दीत जोरदार युद्धसराव सुरु केला आहे. सीमेवरील ही तणावाची परिस्थिती पाहता पुन्हा एकदा मागच्याप्रमाणेच ठिणगी पडून रक्तरंजित संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लडाख आणि तिबेट सीमेवर दोन्ही देशांची हवाई दले तैनात आहेत. शिवाय पेंगाँग सरोवराच्या परिसरात चीनकडून झालेल्या हल्ल्यानंतर अजूनही तेथील सैन्य चीनने कायम ठेवले आहे. चीनची साम्राज्यवादाची राक्षसी भूक पाहता हिंदुस्थानला आता गाफील राहून चालणार नाही.
(Saamana Editorial warning Modi Government Over India China Border Issue)
हे ही वाचा :