शेठ, हा महाराष्ट्र आहे, पुन्हा पाय घसरला तर मोडाल, ‘सामना’तून मोदींवर निशाणा
महाराष्ट्रात सरकार आणि केंद्रात मंत्रिपदं ही नरेंद्र मोदींनी दिलेली ऑफर शरद पवारांनी धुडकावल्याच्या वृत्ताचा 'सामना'च्या अग्रलेखात उल्लेख करण्यात आला आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऑफर दिल्यावरुन शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून निशाणा साधला आहे. ‘शेठ, हा महाराष्ट्र आहे, पुन्हा पाय घसरला तर मोडाल’ असा इशारा शिवसेनेने भाजपला (Saamana on BJP offer to Sharad Pawar) दिला आहे.
‘निवडणूक प्रचारात अमित शाह यांचे सांगणे होते की, “पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले?” याचे उत्तर पवारांनी नंतर योग्य शब्दात दिले. जर पवारांनी काय केले ही शंका अमित शाह वगैरेंना असेल, तर मग कोणत्या अनुभवाचा फायदा नरेंद्र मोदी यांना अपेक्षित होता? हा प्रश्नच आहे.’ असं ‘सामना’मध्ये विचारण्यात आलं आहे.
‘महाराष्ट्रात शिवरायांच्या विचारांचे राज्य येऊन नये हे त्यांचे ध्येय होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही हा त्यांचा ‘कावा’ होता. पवारांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखतोच आहे. या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही. शेठ, काय हे! हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल’ असा इशारा नरेंद्र मोदींना ‘सामना’तून देण्यात आला आहे.
नाराजी नाट्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्रात सरकार आणि केंद्रात मंत्रिपदं ही नरेंद्र मोदींनी दिलेली ऑफर शरद पवारांनी धुडकावल्याच्या वृत्ताचा ‘सामना’च्या अग्रलेखात उल्लेख करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे भयमुक्त जगण्याचे स्वातंत्र्य राहिले नसल्याचा उद्योगपती राहुल बजाज यांनी केलेल्या दाव्यावरुनही ‘सामना’तून टीकेचे बाण (Saamana on BJP offer to Sharad Pawar) सोडण्यात आले आहेत.