सांगली : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. “शेतकऱ्यांच्या पोरांवर ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांच्यासमोर यांनी लोटांगण घातलं. निर्वासितांसारखी वागणूक मिळत असतानाही ते त्यांच्यासोबतच आहेत”, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला (Sadabhau Khot answer to Raju Shetti).
“शेतकरी हितासाठी एकत्र काम करता आले नाही तरी कोणाच्या अडवं जायचं नाही, ही रयत क्रांतीची भूमिका आहे. कोणाला व्यक्तीद्वेषाने पछाडलं असेल तर माझा नाईलाज आहे”, असं सदाभाऊ खोत म्हणाले (Sadabhau Khot answer to Raju Shetti).
सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींना मैत्रीचा हात केला होता. पण राजू शेट्टी यांनी तो प्रस्ताव झिडकारला. उलट राजू शेट्टी यांनी खोत यांच्यावर सडकून टीका केली. “ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहेत. त्यांच्याबरोबरच मी काम करतो”, असा टोला शेट्टी यांनी लगावाला. त्यांच्या या टीकेला खोत यांनी प्रत्युत्तर दिलं. “पंचवीस वर्ष सदाभाऊचा हात हातात होता, तेव्हा रोज काशीला जात होते, आता गोमुत्राने आंघोळ करताय का?”, असा खोचक सवाल खोत यांनी केला.
राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले होते?
ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहेत. त्यांच्याबरोबरच मी काम करतो. ज्यांना पक्षातून हाकलून लावले त्यांना परत पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगतानाच आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा प्रयत्न सुरू आहे. ज्या ठिकाणी आहेत, तिथे काही तरी पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला. खोत यांना शेतकऱ्यांचा एवढाच कळवळा असेल तर त्यांनी ‘कडकनाथ’चे पैसे परत करावेत, असं आव्हानही त्यांनी दिलं.
शेट्टी यांनी दिलेल्या या तीव्र प्रतिक्रियेमुळे शेट्टी-खोत यांच्यातील दिलजमाईचे दरवाजे बंद झाले. त्याआधी खोत यांनी शेट्टी यांच्यासोबत दिलजमाईचे संकेत दिले होते. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो. आमची विचारधारा एकच आहे. केवळ काही मुद्द्यांवर आमचे मतभेद होते, असं खोत म्हणाले होते.
आमच्यातले वाद केवळ शेतकऱ्यांच्या काही मुद्द्यांवर झाले होते. आमच्यात काही बांधावरचं भांडण नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच दोघांचीही भूमिका आहे, असं खोत यांनी म्हटलं होतं. त्यामुळे पहिल्यांदाच खोत आणि शेट्टी एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. दोन्ही संघटनांमधील कार्यकर्त्यांनी त्याबाबत सकारात्मक प्रतिक्रियाही दिली होती. मात्र, शेट्टी यांनी खोत यांना संघटनेचे दरवाजे बंद राहतील असं सांगून दिलजमाईला स्पष्ट नकार दिला.
संबंधित बातमी : पक्षातून हाकलून लावले त्यांना परत घेण्याचा प्रश्नच नाही; राजू शेट्टींचा खोत यांच्याशी हातमिळवणीस नकार