देवेंद्र फडणवीस आम्हाला का आवडतो? हा गडी ना कारखाना काढतो ना बँक,पण सगळ्यांची… सदाभाऊ खोत यांची जोरदार फटकेबाजी
सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे दोघे राजकारणात कसे आले, यामागील पार्श्वभूमीदेखील खोत यांनी या कार्यक्रमात सांगितली.
योगेश बोरसे, पुणेः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हा नेता आम्हाला का आवडतो, याचं सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सांगितलेलं कारण तुफान चर्चेत आहे. पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी जोरदार फटकेबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय चातुर्यावर खोत यांनी स्तुतीसुमनं उधळली. हे बोलताना त्यांनी इतर राजकीय नेत्यांवरही खोचक टीका केली. सदाभाऊ खोत म्हणाले, देवेंद्र फडणवीस आम्हाला का आवडतो? हा गडी कारखाना काढत नाही,बँक काढत नाही, दवाखाना काढत नाही, पण हा माणूस सर्वांची जिरवू शकतो..
‘…. म्हणून त्यांनी मला राजकारणात आणलं’
सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे दोघे राजकारणात कसे आले, यामागील पार्श्वभूमी खोत यांनी सांगितली. ते म्हणाले, ‘ प्रस्थापितांचे राजकारण उध्वस्त करायचे असेल तर विस्थापिताना राजकारणात आणावं लागेल, हे देवेंद्र फडणवीसानी ओळखलं.. त्यामुळे मला आणि गोपीचंद पडळकर या जोडगोळीला राजकरणात आणलं
कृषी कायद्याला मूठभरांचा विरोध होता…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या आणि नंतर रद्द करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांबाबत सदाभाऊ खोत म्हणाले, कृषी कायद्याला विरोध हा शेतकऱ्यांचा नव्हता. हा मूठभर लोकांचा विरोध होता. पण ज्यांनी शेणा मुतात हात घातला नाही त्यांनी आम्हाला तत्वज्ञान शिकवले, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला.
पवार कुटुंबियांवर टीका
बारामती आणि पवार कुटुबियांवर टीका करताना सदाभाऊ खोत म्हणाले, ‘ पुरोगामी नेमकं म्हणायचं कुणाला हेच मला अद्याप कळालं नाही. काही झालं की म्हणायचं हा महाराष्ट्र पुरोगामी आहे.. कारखाने- बँका तुमच्याकडे आहेत , मग सातबारा कोरा का नाही? आमच्या बारामतीकरांचे बघा तेच तेच कायम म्हणायचं समाजसेवा करायची म्हणतात, पण किती दिवस सेवा करणार? असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला.
‘गांधीजींच्या विचारांचा खून नेहरूंनी केला…’
याच कार्यक्रमात सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. महात्मा गांधीचा वध जरी गोडसेंनी केला असला तरी महात्मा गांधींच्या विचारांचा खून हा नेहरूंनी केलाय, हे सत्य स्वीकारावे लागेल. नेहरूंनी देशातील खेडी उध्वस्त केली, असा आरोपही सदाभाऊ खोत यांनी केला.