वरळीसाठी शिवसेनेकडून लातूर ग्रामीणची जागा काँग्रेसला बाय, संभाजी निलंगेकरांचा गंभीर आरोप
धीरज देशमुख लातूर ग्रामीणमधून, तर आदित्य ठाकरे वरळीतून निवडून यावेत, म्हणून शिवसेना-काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वी फिक्सिंग झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप संभाजी पाटील निलंगेकरांनी केला (Worli Latur Rural Vidhansabha Seats)
लातूर : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने लातूर ग्रामीणची जागा काँग्रेसला बाय म्हणून दिल्याचा गंभीर आरोप भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केला आहे. वरळीच्या जागेसाठी शिवसेनेने काँग्रेससोबत फिक्सिंग केल्याचा आरोप संभाजी पाटील निलंगेकरांनी केला. विधानसभेआधीच शिवसेनेने काँग्रेससोबत आघाडीची तयारी केली होती, असा दावाही त्यांनी केला. विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) लातूर ग्रामीणमधून, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) वरळीतून निवडून यावेत, म्हणून समझोता झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप निलंगेकरांनी केला आहे. (Sambhaji Patil Nilangekar claims Shivsena Congress fixing for Worli Latur Rural Vidhansabha Seats)
रमेश कराड भाजप सोडणार होते, तेव्हाच…
2014 मध्ये रमेश कराड हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजप उमेदवार होते. त्यांना 93 हजार मतं मिळाली होती. अवघ्या सात ते आठ हजार मतांनी त्यांची जागा गेली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सेना-भाजपची युती होती. कराड यांची उमेदवारी ग्राह्य धरली जात असताना शिवसेनेने या जागेसाठी टोकाचा आग्रह धरला. अखेर युती टिकवण्यासाठी रमेश कराड यांना भाजप सोडून शिवसेनेकडून लढवण्याचा निर्णय झाला. त्यांना आम्ही शिवबंधन बांधण्यास सांगितलं, कराड पक्षप्रवेश करणार त्याचवेळी सचिन देशमुख यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली, असा दावा संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे.
“भाजपला धोका देण्याचं आधीच ठरलं होतं का?”
लातूरमधील स्थानिक स्वराज्य संस्था रमेश कराड यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे लातूर ग्रामीणची जागा कराड यांना सुटणार, हे निश्चित मानलं जात होतं. मात्र जागा मागून घेऊन शिवसेनेने ऐनवेळी सचिन देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. सचिन देशमुख यांना शिवसैनिकही ओळखत नव्हते. त्यामुळे भाजपसोबत युती असताना शिवसेना काँग्रेसला बाय देत आहे का? सेना-काँग्रेसचं आघाडी करण्याविषयी आधीच ठरलं होतं का? भाजपला धोका देण्याचं आधीच ठरलं होतं का? असे प्रश्न निलंगेकरांनी उपस्थित केले. (Sambhaji Patil Nilangekar claims Shivsena Congress fixing for Worli Latur Rural Vidhansabha Seats)
“धीरज देशमुख नोटाच्या विरोधात निवडून”
लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस उमेदवार (धीरज देशमुख) वरळीत राहतात. त्यांचं सतत मुंबईला येणं-जाणं असतं. लातुरातील सामान्य माणसालाही हे माहित आहे. काँग्रेस उमेदवाराला विचारा, तुम्ही कोणाच्या विरोधात निवडून आलात, तर ते सांगतील आम्ही ‘नोटा’च्या विरोधात निवडून आलो. कारण ‘नोटा’ला तब्बल 28 हजार मतदान झालं होतं. इतक्या मोठ्या प्रमाणावर नोटाला मतदान झालं, याकडे निलंगेकरांनी लक्ष वेधलं.
जनता उत्तर देईल, निलंगेकरांचा इशारा
सर्व स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेसच्या विरोधात आहेत. जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगर पंचायती भाजपकडे आहेत. मग शिवसेनेने त्याच जागेचा आग्रह का केला, असा सवाल संभाजी पाटील निलंगेकरांनी उपस्थित केला. हा मुद्दा वर येण्याचं कारण म्हणजे साडेतीनशे शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आम्ही ज्या पक्षासाठी जीवापाड काम केलं, त्यांनी दगा केला. न लढता फिक्सिंग करणं हा लोकशाहीचा खून आहे. तुम्ही एकदा जिंकाल, पण हे सतत होणार नाही, जनता याचं उत्तर देईल, असा इशाराही संभाजी पाटील निलंगेकरांनी दिला.
संबंधित बातम्या :
धीरज देशमुखांसाठी काँग्रेसची शिवसेनेसोबत फिक्सिंग? संभाजी पाटील निलंगेकरांचा गौप्यस्फोट
कट्टर राजकीय विरोधक निलंगेकर आजोबा-नातू एकाच मंचावर
(Sambhaji Patil Nilangekar claims Shivsena Congress fixing for Worli Latur Rural Vidhansabha Seats)