संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई पोलिसांच्या ताब्यात, चिखलीतच रोखलं; अनेकांची धरपकड
पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांना ताब्यात घेतलं. तसेच इतर मनसैनिकांची धरपकड केली. त्यामुळे मनसैनिकांनी जोरदार निदर्शने केल्यामुळे या परिसरातील वातावरण तापलं आहे.
बुलढाणा: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात विधान केल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांचा निषेध म्हणून त्यांची पदयात्रा रोखण्यासाठी मनसे सैनिक बुलढाण्याच्या दिशेने निघाले. पण त्यांना पोलिसांनी मध्येच अडवले आहे. पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांना ताब्यात घेतलं. तसेच इतर मनसैनिकांची धरपकड केली. त्यामुळे मनसैनिकांनी जोरदार निदर्शने केल्यामुळे या परिसरातील वातावरण तापलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी कालच संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ बुलढाण्याच्या दिशेने रवाना झालं होतं. बसभरून शिवसैनिक बुलढाण्याच्या दिशेने गेले होते. मात्र, पोलिसांनी ही बस चिखलोलीतच रोखली. तसेच संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव यांच्यासह इतर मनसैनिकांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतलं.
यावेळी मनसैनिकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तसेच जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी आणि काँग्रेसचा निषेध नोंदवला. मनसैनिकांनी सुरू केलेल्या निदर्शनामुळे वातावरण तापलं होतं. पोलिसांनी या सर्व मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात नेलं आहे.
दरम्यान, संदीप देशपांडे यांनी या अटकेचा निषेध नोंदवला आहे. आम्हाला जायला देत नाहीत. आम्ही पोलिसांना विनंती केली आहे. चिखलीत सभा घेण्याची परवानगी मागितली आहे. आम्ही सभेसाठी अर्ज दिला आहे.
आम्हाला शेगावला जायला देत नसाल तर चिखलीत सभा घ्यायला परवानगी द्या असं आम्ही पोलिसांना सांगितलं आहे. राहुल गांधी प्रसिद्धीचा स्टंट करत आहेत. त्यांच्या सभेला प्रसिद्धी मिळाली नाही. म्हणून त्यांनी सावरकरांवर टीका केली. इतर राज्यात त्यांनी हा विषय का काढला नाही? महाराष्ट्रातच का काढला? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या शेगांव येथील जाहीर सभेसाठी येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे. सभास्थळी जाण्यापूर्वी पोलीस कसून तपासणी करत आहेत. मनसेने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सागर आव्हाड यांनी सभा स्थळाची पाहणी केली आहे.