“मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल, शंकराचार्य नाही”; संजय निरुपम यांनी सुनावले
ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना नेते उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर आता यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे.
Sanjay Nirupam On Uddhav Thackeray was betrayed statement : “उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे माहीत आहे. ज्या लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात केला, ते हिंदू कसे असू शकतात?” असा प्रश्न ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी उपस्थित केला. ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना नेते उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर आता यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. आता या प्रकरणावरुन शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी सुनावले आहे.
“हा विश्वासघात नाही का?”
“शंकराचार्यांचे पद हे श्रद्धेचे पद आहे. शंकराचार्यजींनी काल ज्या पद्धतीने राजकीय भाष्य केले, त्यावर आमचा आक्षेप आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजप सोडला. हा विश्वासघात नाही का?” असा प्रश्न संजय निरुपम यांनी उपस्थित केला. नुकत्याच एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल”
“जगतगुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे धार्मिक कमी आणि राजकीय जास्त आहेत. उद्धव ठाकरेंना भेटणं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. यावर कोणताही आक्षेप नाही. मात्र त्यांनी शिवसेनेच्या अंतर्गत वादावर राजकीय भाष्य करणे टाळायला हवे होते. ते त्यांना शोभत नाही. मुख्यमंत्री कोण होणार आणि कोण नाही हे जनता ठरवेल, शंकराचार्य नाही”, अशा शब्दात संजय निरुपम यांनी शंकराचार्यांवर जोरदार निशाणा साधला.
“विश्वासघात हा मानवी दुर्गुण”
“जे लोक विश्वासघात करतात ते हिंदू असू शकत नाहीत. हे फार विचित्र तर्क आहे. सर्वप्रथम हे ठरवावे लागेल की विश्वासघात कोणी केला? आणि शंकराचार्य हे ठरवू शकत नाहीत. दुसरे, हिंदू पौराणिक कथा आणि इतिहासात विश्वासघाताची अनेक उदाहरणे आहेत. तो हिंदू नव्हता का? विश्वासघात हा मानवी दुर्गुण आहे. त्याचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही. होय, या अवगुणामुळे एखादा चांगला किंवा वाईट हिंदू असू शकतो. पण तो हिंदू असू शकत नाही, हा खोटापणा आहे”, असेही संजय निरुपम यांनी सांगितले.