Sanjay Rathod : संजय राठोड यांचा ठाकरे गटाला दे धक्का, 200 हून अधिक कार्यकर्ते शिंदे गटात, महंतांना शिवबंधन बांधल्याचा काढला वचपा
Sanjay Rathod : संजय राठोड यांनी ठाकरे गटाला दे धक्का दिला आहे..
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) गटाला दे धक्का दिला आहे. ठाकरे गटातील जवळपास 200 कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघात (Digras Constituency) गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने राजकीय कुरघोडी सुरु आहेत. बंजारा समाजाचे महंत असणाऱ्या सुनील महाराज यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधल्यानं राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्याचा वाचपा आता राठोड यांनी काढल्याची चर्चा रंगली आहे.
दिग्रस मतदारसंघात सातत्याने सत्ता समीकरणे बदलत आहेत. एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी दोन्ही गट सोडत नसल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी महंत सुनील महाराज यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधले होते. हा राठोड यांना राजकीय फटका मानण्यात येत होता.
तर आता राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, नगराध्यक्ष, कार्यकर्ते यांची मोट बांधून ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात काम करतील अशी प्रतिक्रिया राठोड यांनी दिली.
संजय राठोड यांच्यावर एका तरुणीच्या आत्महत्येनंतर गंभीर आरोप कऱण्यात आले होते. त्यानंतर राठोड यांना मंत्रिपद सोडावं लागलं होतं. तेव्हा राठोड यांच्यामागे बंजारा समाज उभा करण्यासाठी सुनील महाराज यांनी पुढाकार घेतला होता.
पण सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस महंत सुनील महाराज यांनी कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला होता. ते बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीचे महंत आहेत. त्यांच्या प्रवेशाने ठाकरे गटाने ताकद दाखवून दिली होती.
आता राठोड यांनीही मतदारसंघात त्यांची शक्ती पणाला लावली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात यवतमाळ जिल्ह्यात आता शह-कटशाहचे राजकारण रंगेल असे दिसते.