सर्जिकल स्ट्राईकही 24 तासात झाला होता, पण राज्यपालांचं संशोधन सुरूच; राऊतांची खोचक टीका
विधान परिषदेच्या 12 नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष्य केलं आहे. (sanjay raut attacks governor bhagat singh koshyari over appointment of 12 MLA of Legislative Council)
मुंबई: विधान परिषदेच्या 12 नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष्य केलं आहे. मोदींनी सर्जिकल स्ट्राईकही 24 तासांत केला होता. पण सहा महिने उलटले तरी राज्यपालांचं नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत संशोधन सुरूच आहे, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. (sanjay raut attacks governor bhagat singh koshyari over appointment of 12 MLA of Legislative Council)
संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून आधी राज्यपाल कोश्यारींवर टीका केली. त्यानंतर मीडियाशी बोलताना पुन्हा एकदा त्यांनी राज्यपालांवर टीका केली. सहा महिने झाले. त्या फाईलवर निर्णय नाही. राज्यपालांचं कोणतं संशोधन सुरू आहे? मोदींनीही 24 तासात सर्जिकल स्ट्राईक केला होता. पण राज्यपालांना निर्णय घेता येत नाही, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.
वादळात फायली वाहून गेल्या असाव्यात
12 सदस्याचं सदस्यत्व रोखून ठेवणं हा घटनेचा भंग आहे. यात राजकारण असून हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. राजभवनात काही तुफान आलं असावं आणि त्या वादळात फाईल वाहून गेल्या असाव्यात. किंवा तिथे भूतप्रेत आलं असेल म्हणूनच त्या फायली गायब झाल्या, अशी टीका त्यांनी केली. आज 12 सदस्यांची नियुक्ती झाली असती तर आमदार म्हणून त्यांनी कोरोना काळात जोमाने काम केलं असतं, असंही ते म्हणाले.
तुमची काही जबाबदारी आहे की नाही?
यावेळी त्यांनी कोकणातील वादळामुळे नुकसान झालेल्यांना मदत करण्यावरूनही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री नुकसानग्रस्तांना मदत करतीलच. पण महाराष्ट्राला लुटायचं काम दिल्लीवाले करत आहेत. त्यांची काही जबाबदारी नाही का? असा सवालही त्यांनी केला. तुम्ही गुजरातला एक हजार कोटी रुपये देऊ शकता. परंतु, महाराष्ट्राचा आक्रोश आणि वेदना तुम्हाला कळत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तर चक्काजाम आंदोलन केलं असतं
बाबा रामदेव यांच्या वक्तव्यावरूनही त्यांनी भाजपवर टीका केली. बाबा रामदेव यांच्याऐवजी दुसरं कोणी बोललं असतं तर भाजपने रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केलं असतं, असा टोला त्यांनी हाणला.
सामनातून टीका
दरम्यान, राऊत यांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातूनही राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. राज्यपालांनी करावीत अशी अनेक कामे आहेत. फायलींवर बसून राहण्यापेक्षा ही कामे केल्याने त्यांचा नावलौकिक वाढेल. महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे. याबाबत राज्यपालांनी केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे. ‘तौकते’ चक्रीवादळात नुकसान झाले. पंतप्रधानांनी गुजरातच्या वादळग्रस्तांना हजार कोटी दिले. मग महाराष्ट्रावर अन्याय का करता? माझ्या राज्यालाही पंधराशे कोटी द्या, अशी मागणी करून राज्यपालांनी ‘मऱ्हाटी’ जनतेची मने जिंकली पाहिजेत. हे सर्व करायचे सोडून राज्यपाल सहा महिन्यांपासून एका फाईलचे राजकारण करीत आहेत. आता तर ती फाईलही भुतांनी पळविली. राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे? एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल! असा खोचक सल्ला ‘सामना’तून देण्यात आला आहे. (sanjay raut attacks governor bhagat singh koshyari over appointment of 12 MLA of Legislative Council)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 24 May 2021 https://t.co/J5c5kK2nlP #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2021
संबंधित बातम्या:
राजभवनात भुताटकीचा वावर, एकदा शांतीयज्ञ करून घ्या, शिवसेनेचं टीकास्त्र
वादळ 4 तास थांबलं, मुख्यमंत्री 3 तासही थांबले नाहीत, प्रवीण दरेकरांची खोचक टीका
राज्यसरकार नुकसानग्रस्तांना मदत करेलच, पण फडणवीसांनीही केंद्राला पत्र लिहावं : रोहित पवार
(sanjay raut attacks governor bhagat singh koshyari over appointment of 12 MLA of Legislative Council)