Rajya Sabha Election 2022: शिंदे, शिंदे, भुयार, ठाकूर, शिवसेनेच्या संजय पवारांचा गेम करणाऱ्या एका एका आमदाराचं नाव संजय राऊतांनी जगजाहीर घेतलं
Rajya Sabha Election 2022: काही जे घोडे असतात बाजारातले नेहमीचे ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते. जास्त बोली लागली असं वाटतं मला. किंवा इतर काही कारणं असेल. त्यामुळे आमची अपक्षांची सहा मते आम्हाला मिळाली नाहीत.
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेनेचे संजय पवार (sanjay pawar) यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अपक्षांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे आम्ही पराभूत झालो. या निवडणुकीत घोडेबाजार झाला. काही घोड्यांना हरभरे टाकले होते. जिकडे हरभरे असतात तिकडे घोडे जात असतात, असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला. कोल्हापूरचे संजय मामा शिंदे, नांदेडचे श्यामसुंदर शिंदे, देवेंद्र भुयार यांनी आम्हाला मत दिलं नाही. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनेही आम्हाला मतदान केलं नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला. राऊत यांनी थेट नाव घेऊन हा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. काही लोकांनी शब्द देऊन फसवणूक केली. शेअरबाजार वरखाली होत असतो. त्यामुळे त्याला मॅनडेट मानता येत नाही. शेअरबाजार वरखाली होतच असतो, असं सूचक विधानही त्यांनी केलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.
आघाडीसोबत असलेल्या अपक्षांची मते फुटली असली तरी आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. घोडेबाजारातील घोड्यांमुळे कोणताही परिणाम होत नाही. विशेषत महाराष्ट्रात घोडे तिकडे असतील किंवा इकडे असतील… हरभरे टाकले की ते कुठेही जातात, असं राऊत म्हणाले.
हरभऱ्याच्या झाडावर चढू नका
विधान परिषद निवडणुकीतही याच विजयाची पुनरावृत्ती होईल असं भाजपने म्हटलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. हो.. हो नक्की. बरं बरं बघू ना. फार हरभऱ्याच्या झाडावर चढू नका. हरभरे काही अपक्षांनी खाल्ले आहेत, तुम्ही हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, असा सूचक इशारा राऊत यांनी दिला.
आघाडीची मते फुटली नाही
काही जे घोडे असतात बाजारातले नेहमीचे ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते. जास्त बोली लागली असं वाटतं मला. किंवा इतर काही कारणं असेल. त्यामुळे आमची अपक्षांची सहा मते आम्हाला मिळाली नाहीत. हे लोक कुणाचेच नसतात. असे लोक कुणाचेच नसतात. पण जे घटक पक्ष आहेत. आमचे लोक आहेत. छोटे पक्ष आहेत, जे शिवसेना किंवा आघाडीबरोबर आहेत. त्यांचं एकही मत फुटलं नाही. सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बच्चू कडू, गडाख, यड्रावकर इतर काही मतांविषयी आम्ही चर्चा केली होती. ती सर्व मते आम्हलाा मिळाली आहेत. फक्त घोडेबाजारात जे उभे होते त्यांचे सहा सात मते पडली नाही. आम्ही कोणत्याही व्यवहारात पडलो नाही. व्यापार केला नाही. तरीही आम्हाला 33 मते मिळाली हा आमचा विजय आहे. अर्थात ज्या कुणीही शब्द देऊन दगाबाजी केली आहे. त्यांची यादी आमच्याकडे आहे. त्यांची नावं आमच्याकडे आहेत. कुणी मते दिले नाही हे आम्ही माहीत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दिल्लीची ताकद वापरली
दिल्लीची ताकद वापरून घोडेबाजाराला मोकळं रान करून दिलं. महाराष्ट्राला घोडेबाजारात ढकललं आहे. त्याची नोंद केली आहे. तुम्ही काही दिवस आनंद साजरा करा. आम्ही या घोडेबाजारातील लोकांची नोंद केलीच आहे, असंही ते म्हणाले. या पराभवाने आम्हाला झटका बसलेला नाही. हा काही मोठा विजय नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.