नवी दिल्ली : राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena) आणि भाजप असा संघर्ष सुरु आहे. खरी शिवसेना कुणाची हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. दुसरीकडे पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना दोन वेळा ईडीने समन्स बजावलं आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) आणि भाजपवर जोरदार निशाना साधलाय. खोट्या केसेस टाकून अटक करायची असेल तर शिवसैनिक म्हणून सेनेसाठी अटकेला सामोरा जाणार. मी कुठेही मला वाचवा म्हणून कुणासमोर गुडघे टेकणार नाही. संजय राऊत बाहेर असले तर या सरकारला अडचणी येतील, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
संजय राऊत म्हणाले की, या देशावर कुणी राज्य करावं हे जनता ठरवेल. पण राज्यकर्त्यांनी देशावर राज्य करु नये. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाया होत आहेत. कुणी धुतल्या तांदळासारखा आहे? काल अर्जुन खोतकर यांचं निवेदन ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर तणाव आहे. संकटाच्या काळात सुटकेचा मार्ग शोधतो. शिवसेनेच्या कार्यपद्धतीनं नाराज असल्यानं सेना सोडली नाही. त्यांची मालमत्ता जप्त केली गेली. काहीही होऊ द्या. माझ्यासाठी अनेक जणांना अटक करायची आहे. संजय राऊत बाहेर असेल तर या सरकारला अडचणी येतील. खोट्या केसेस टाकून अटक करायची असेल तर शिवसैनिक म्हणून कुणासमोरही गुडघे टेकणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केलाय.
तसंच महाराष्ट्रात सत्तांतर झालं तरी वावगं वाटू नये. त्यांना दिल्लीत यावं लागतं यातच महाराष्ट्राच्या मनाला किती ठेच लागते हे दिसतं. भाजपला शिवसेना फोडायची होती. ठाकरेंचे शिवसैनिक ते आमदार म्हणून कसे घेतील. हा कद्रुपणा आहे. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत, ते सर्वोच्च नेते आहेत. त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला, असंही राऊत म्हणाले.
राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीसांवरही जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री 4 वेळाही दिल्लीला आले नाहीत. आताचे मुख्यमंत्री 5 वेळा आले. सेनेचे मुख्यमंत्री म्हणून जर कुणी घेत असतील तर सेनेच्या मुख्यमंत्र्याला दिल्लीत यावं लागलं नाही. सेनेचे हायकमांड मुंबईतच आहेत. ते दिल्लीला स्थायिक होतात की काय अशी परिस्थिती झाली आहे, असा टोला राऊतांनी हाणलाय.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा केला आहे. या गटानं फुटून महाराष्ट्राला काय दिलं. त्यांना दुसऱ्या पक्षाचा आसरा घ्यावा लागेल. आमदार आमच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर झालं तर वावगं वाटण्याचं कारण नाही, असा दावाही राऊत यांनी केलाय. राऊतांच्या या दाव्याला आता एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या गटाकडून काय प्रत्युत्तर मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.