‘एक अकेला सब पर भारी’, संजय राऊतांकडून राहुल गांधींची पाठराखण, म्हणाले ‘भाजपच्या नकली हिंदुत्वाचा…’
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, असा आरोप भाजप नेहमी करतं.
Sanjay Raut Comment on Rahul Gandhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी अग्निवीर योजना, हिंदुत्व आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर आरोप केले. जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात आणि 24 तास हिंसा आणि द्वेष पसरवतात, ते हिंदू नाहीत, असे वक्तव्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी यांच्या भाजपवरील या आरोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेप घेतला. आता यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींची पाठराखण केली आहे.
“नऊ मंत्री, एक गृहमंत्री आणि एक अकेला सब पर भारी म्हणजे नरेंद्र मोदी या सर्वांना काल राहुल गांधी भारी पडले. मजबूत विरोधी पक्ष आणि प्रामाणिक विरोधी पक्षनेता काय असतो, हे काल देशाला पहिल्या दिवशी दिसलं. ही सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या”, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले.
“प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हिंदुत्वाचे सर्वात मोठे गुरु शंकराचार्य यांना आमंत्रित केले गेलं नाही. त्यांनी हिंदुत्वावर गप्पा माराव्यात. काल राहुल गांधींचे भाषण हे देशाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक होतं. राहुल गांधी यांनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा उतरवला. राहुल गांधी यांनी काल काय चुकीचं सांगितलं. आम्ही हिंदुत्व सोडलं, शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, असा आरोप भाजप नेहमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी करतं. तेव्हा उद्धव ठाकरे जे उत्तर देतात, तेच उत्तर राहुल गांधींनी दिलं”, असेही संजय राऊत म्हणाले.
“उद्धव ठाकरे कायम म्हणतात की आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्व सोडलेलं नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. राहुल गांधींनी काल नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या तोंडावर सांगितलं की तुम्ही हिंदुत्वाचा ठेका घेतलेला नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. हिंदुत्वाची व्यापती, हिंदुत्वाचा विचार खूप मोठा आहे, जो तुम्हाला समजलेला नाही”, असेही संजय राऊत म्हणाले.
“काल राहुल गांधी भारी पडले”
“नऊ मंत्री, एक गृहमंत्री आणि एक अकेला सब पर भारी म्हणजे नरेंद्र मोदी या सर्वांना काल राहुल गांधी भारी पडले. त्यांना वारंवार हस्तक्षेप करावा लागला. आपली बाजू मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे सरंक्षण मागावं लागलं. कालचं चित्र फार विचलित करणार होतं. गेल्या १० वर्षात पहिल्यांदाच देशाच्या मजबूत गृहमंत्र्यांना संसदेत ओम बिर्लांकडे सरंक्षण मागावे लागले. कालपर्यंत यांची इतकी हुकूमशाही आणि दादागिरी होती, तेव्हा आम्हाला यांच्यापासून सरंक्षण मागावं लागत होतं. पण राहुल गांधींनी काल संसदेत त्यांना गुडघ्यावर आणलं. त्यांना ओम बिर्लांकडे सरंक्षण मागावं लागलं. हे चित्र देशाने पाहिले. मजबूत विरोधी पक्ष आणि प्रामाणिक विरोधी पक्षनेता काय असतो, हे काल देशाला पहिल्या दिवशी दिसलं. ही सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या”, असेही संजय राऊतांनी सांगितले.
नेमकं काय घडलं?
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी भगवान शंकराचा फोटो घेऊन आज संसदेत दाखल झाले. त्यांनी भगवान शंकराचा फोटो हातात घेऊन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. मी या फोटोच्या माध्यमातून काही सांगू इच्छितो. शिवशंकर यांच्यापासून कधीही निर्भय राहण्याची शक्ती मिळते. भगवान शंकाराकडून आपल्याला सत्यापासून कधीही मागे हटू नये, अशी प्रेरणा मिळते. भगवान शंकराच्या डाव्या हातातील त्रिशूळ हे अहिंसाचं प्रतीक आहे. हे त्रिशूळ जेव्हा उजव्या हातात असतं तेव्हा ते हिंसाचं प्रतीक असतं. सत्य, धाडस आणि अहिंसा हेच आमचं संबळ आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
यावेळी सभागृहात गुरुनानक यांचा फोटो दाखवत राहुल गांधी यांनी भूमिका मांडली. “शिवशंकर म्हणतात, घाबरु नका आणि घाबरवू नका. जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात आणि 24 तास हिंसा आणि द्वेष पसरवतात, ते हिंदू नाहीत”, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्या भाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्षेप घेतला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे योग्य नाही, असे पंतप्रधान म्हणाले. तर, गृहमंत्री अमित शाह यांनी जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते हिंसा करतात. त्यांना माहित नाही की करोडो लोक अभिमानाने स्वतःला हिंदू म्हणवतात. ते सगळे हिंसाचार करतात का? राहुल गांधी यांनी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.