Sanjay Raut | आता करेक्ट कार्यक्रम करायचा! संजय राऊतांचा इशारा, अलिबागच्या मेळाव्यात बंडखोरांवर टीकेचे बाण
हिंदुत्वाच्या मुद्दयासाठी गुवाहटीत जमलेल्या आमदारांवर टीकास्त्र सोडताना संजय राऊत यांनी शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही पुन्हा एकदा सडकून टीका केली.
मुंबईः महाविकास आघाडीचा कार्यक्रम करणाऱ्यांचा आता करेक्ट कार्यक्रम करण्याची वेळ आली आहे, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. अलिबाग येथील शिवसेनेच्या (ShivSena) मेळाव्याला संबोधित करताना राऊतांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या बंडखोर आमदारांवर (Rebel MLA) निशाणा साधला. ईडीच्या भीतीने मलाही अटकेची भीती दाखवली जात आहे, मात्र या गोष्टींना मी घाबर नाही. मी कधीही गुवाहटीत जाणार नाही, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. हिंदुत्वाच्या मुद्दयासाठी गुवाहटीत जमलेल्या आमदारांवर टीकास्त्र सोडताना संजय राऊत यांनी शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही पुन्हा एकदा सडकून टीका केली.
‘करेक्ट कार्यक्रम करायचा’
महाविकास आघाडी सरकार धोक्यात आल्याचं चित्र दिसून येतंय. मात्र आता खरा करेक्ट कार्यक्रम करण्याची वेळ आली आहे. इथे एवढ्या मोठ्या संख्येने शिवसैनिक जमत आहे. महिला वर्गही येत आहे. रिक्षाच्या रिक्षा भरून कार्यकर्ते गर्दी करत आहेत. त्यामुळे शिवसेना जागेवरच आहे. आमदार वॉकर घेऊन पळून गेलेत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.
‘दि बा पाटील हे जातीपुरते मर्यादित नव्हते’
नवी मुंबई येथील विमानतळाला दि बा पाटील नाव देण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदिल दर्शवला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘दि बा पाटील हे फक्त आगरी समाजाचे नाही तर महाराष्ट्र्ताी कष्टकरांचे नेते होते. जिथे जिथे अन्याय झाला तिथे दि बा पाटील दिसले. त्यामुळे त्यांना फक्त एका समाजापुरते मर्यादित ठेवू नका. ते मोठे नेते होते. बाळासाहेब ठाकरेंचे सहकारी होते….’
अलिबागला नाहीत का हाटेल?
गुवाहटीत गेलेले आमदार शहाजी बापू पाटील यांची ऑडिओ क्लिप सध्या तुफान व्हायरल होतेय. काय झाडी.. काय हाटिल.. काय डोंगुर.. या आमदारांच्या वक्तव्यावर संजय राऊतांनीही त्यांचा समाचार घेतला. राऊत म्हणाले, ‘आराम करतायत. काय तो डोंगूर.. काय ते हाटेल.. काय तो मसाज.. एकदम ओके.. आता हॉटील अलिबागला नाही का, डोंगूर अलिबागला नाही का.. सगळं आहे. झाडी नाही इकडे. बघा जाऊन.. हाटील इकडे पण आहेत की.. पण यांची यायची अजिबात हिंमत नाही.’
शंभर गोठ्यात शेण काढून आलेला माणूस…
शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, ‘याचं म्हणे हिंदुत्व धोक्यात आलंय.. कुठून कुठून फिरून आलाय. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, त्याच्या आधी कुठे होता … शंभर गोठ्यात शेण काढून आलेला माणूस.. आपल्याकडे बैलगाड्याच्या शर्यती चालतात. आता या बैलाला बदललं पाहिजे…’
‘देशात दोनच सेना’
संजय राऊत पुढे म्हणाले, ‘ महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचं कारस्थान आहे. पण यामुळे शिवसेना संपेल ? 56 वर्ष शिवसेना उभी आहे. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. आता दोनच सेना राहिल्या. शिवसेना आणि भारतीय सेना. इंडियन आर्मी. या दोन्ही सेना हिंदुस्तानचं रक्षण करतात..’