‘आधी झोपेतून जागे व्हा’, चंद्रकांत पाटलांच्या सत्ताबदलाच्या वक्तव्यावरुन संजय राऊतांचा टोला
पहाटेच्या शपथविधीला आज 2 वर्षे पूर्ण झाली. त्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार टोलेबाजी सुरु आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवीन वर्षात हे सरकार जाणार आहे, असं वक्तव्य केलं. तर शिवसेना खासदार संजय राऊतांनी आधी झोपेतून जागे व्हा, असा टोला लगावला आहे.
मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात जोरदार राजकीय हालचाली सुरु होत्या. त्यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पहाटेच्या वेळी शपथ घेत सत्तास्थापन केली होती. मात्र, हे सरकार अल्पजीवी ठरलं आणि अवघ्या 80 तासांत ते कोसळलं. या पहाटेच्या शपथविधीला आज 2 वर्षे पूर्ण झाली. त्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार टोलेबाजी सुरु आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवीन वर्षात हे सरकार जाणार आहे, असं वक्तव्य केलं. तर शिवसेना खासदार संजय राऊतांनी आधी झोपेतून जागे व्हा, असा टोला लगावला आहे. (Criticism of Sanjay Raut on the statement of Chandrakant Patil about the change of power in Maharashtra)
‘पाटील भाजपचे राज्याचे अध्यक्ष, त्यांना असं बोलावं लागतं’
संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. त्यानंतर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. नवीन वर्षात हे सरकार जाणार आहे आणि गुढीपाडव्यापर्यंत नव्या सरकारची मुहूर्तमेढ रोवली जाईल, या चंद्रकांत पाटलांच्या विधानाबाबत विचारलं असता, राऊतांनी जोरदार टोलेबाजी केली. ‘चंद्रकांत पाटील यांनी आतापर्यंत 28 वेळा असं विधान केलं आहे की हे सरकार जाईल. त्याची माझ्याकडे नोंद आहे. त्यांना बोलत राहूद्या. चंद्रकांत पाटील हे भाजपचे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी असं बोलणं गरजेचं आहे. त्यांच्या अशा बोलण्याचं काही हे सरकार जात नाही हे सगळ्यांना माहिती आहे. हे सरकार पुढील 25 वर्षे टिकेल आणि या सरकारचं पॉवर सेंटर जिथे आहे तिथे मी आता उभा असल्याचं राऊतांनी सांगितलं.
झोपेतून जागे व्हा, राऊतांचा खोचक सल्ला
पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. बहुतेक त्याच शपथविधीचे झटके पाटलांना बसत असावेत. म्हणून ते सारखं म्हणत आहेत की सरकार पडेल, सरकार पडेल. झोपेतून जागे व्हा, एवढंच मी त्यांना सांगेन, असा टोलाही राऊतांनी चंद्रकांत पाटलांना लगावलाय.
‘एसटी संपावरुन भाजपवर हल्लाबोल’
‘महाराष्ट्रातील वातावरण कोण भडकवतंय आणि का भडकवतंय त्यामागचा हेतू काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. एसटीच्या संपात तेल ओतण्याचं काम कोण, का करतंय यासंदर्भात आमच्याकडे माहिती आहे. महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न अमरावतीपासून एसटी संपापर्यंत चालले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी सगळ्यांना सहानुभूती आहे. जे जे त्यांच्यासाठी करता येणं शक्य आहे ते सरकार करत आहे. कालच शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांनी चर्चाही केली आहे. मला आजच्या पवारसाहेबांसोबतच्या बैठकीतून असं समजलं की त्यांनी काही सकारात्मक सूचना दिलेल्या आहेत’, अशी माहिती राऊत यांनी दिली.
इतर बातम्या :
‘नाचता येईना, अंगण वाकडं’ अशी सरकारची अवस्था, प्रीतम मुंडेंची टीका, ओबीसी आरक्षणावरुन घणाघात
Criticism of Sanjay Raut on the statement of Chandrakant Patil about the change of power in Maharashtra