मुंबई : दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. तिला नंतर मारून टाकले. राहुल गांधी त्या मुलीच्या नातेवाईकांना भेटायला गेले. तेव्हा भाजपने विचारले, ‘काँग्रेसशासित राज्यांत बलात्कार होत नाहीत काय?’ बलात्कारांना राजकीय पक्ष निर्माण झाले. हे प्रथमच घडत आहे, अशी टाका करत बलात्कार, महिला अत्याचारास तरी जात, धर्म आणि राजकीय पक्ष नसावेत, अशी अपेक्षा आजच्य सामना रोखठोकमधून व्यक्त करण्यात आलं आहे. राहुल गांधींनी पीडित कुटुंबाची घेतलेली भेट, नंतर भाजपने उपस्थित केलेले सवाल, ट्विटरने घेतलेली अॅक्शन, यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजचं ‘रोखठोक’ लिहिलं आहे. (Sanjay Raut Criticized BJP Over Rahul Gandhi met Delhi Rape Case Victim)
महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात सध्या मोठीच मजा सुरू आहे. कोणत्याही विषयाचे गांभीर्य हरवलेला देश असेच वर्णन आपल्या देशाचे यापुढे करावे लागेल. राजधानी दिल्लीजवळ असलेल्या नांगलराय परिसरात नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या करण्यात आली. या निर्घृण प्रकाराने मनुष्य जातीला कलंक लागला. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे व येथील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाची आहे. पण ही जबाबदारी घ्यायला भारतीय जनता पक्ष तयार नाही.
काही वर्षांपूर्वी दिल्लीत ‘निर्भया कांड’ झाले. एका तरुण मुलीवर बसमध्ये बलात्कार करून तिला फेकण्यात आले. तेव्हा भारतीय जनता पक्षाने दिल्लीसह देशभरात महिलांवरील अत्याचाराबाबत त्यावेळच्या मनमोहन सिंग सरकारला जबाबदार ठरवले. दिल्लीचे रस्ते जाम केले व संसदेचे काम चालू दिले नाही. आज नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. राहुल गांधींसह अनेक नेते पीडितेच्या माता-पित्याच्या सांत्वनासाठी भेटायला नांगलरायला जात आहेत. भाजपला हे सर्व पटत नाही व ढोंग वाटते.
भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा हे तर सगळ्यांच्याच दोन पावले पुढे गेले. ‘काँग्रेसशासित राज्यांत बलात्कार होत नाहीत काय?’ असा उलट प्रश्न त्यांनी केला. राजस्थान, पंजाब, छत्तीसगढ या राज्यांतील अशा घटनांची आकडेवारी त्यांनी जाहीर केली. काँग्रेसशासित राज्यांत महिलांवरील अत्याचार वाढले म्हणून भाजप राज्यात असे गुन्हे माफ करावे, त्याकडे दुर्लक्ष करावे असे कोणाला वाटत असेल आणि ते राज्यकर्ते म्हणून बसले असतील तर त्यांना कसलेच गांभीर्य उरलेले नाही, असेच म्हणायला हवे.
राहुल गांधी हे त्या बलात्कारपीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटायला गेले याचा संताप भाजप पुढाऱ्यांना का यावा? उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका मुलीवर गेल्या वर्षी असाच बलात्कार झाला होता. तेव्हा प्रियांका गांधी त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचल्या व प्रियांका पोहोचू नयेत म्हणून उत्तर प्रदेश सरकारने पूर्ण नाकेबंदीच करून ठेवली होती. आपल्या राज्यात अशा प्रकारचे गुन्हे घडतात तेव्हा विरोधकांनी तेथे पोहोचू नये अशी तेथील सरकारची इच्छा असते.
हे लोकशाहीला धरून नाही. अत्याचारग्रस्त आणि बलात्कारपीडितांचा आवाज हा अशा वेळी विरोधी पक्ष असतो. राहुल गांधी हे दिल्लीतील बलात्कारपीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटायला गेले.
राहुल गांधी तेथे गेले. त्या मुलीची अभागी माता राहुल गांधी यांच्या छातीवर डोके ठेवून आक्रोश करीत असल्याचे चित्र दिल्लीतील मीडियाने ठळकपणे छापले. हे छायाचित्र गांधी यांनी त्यांच्या ‘ट्विटर’वर प्रसिद्ध केले. आता राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने या छायाचित्रालाच आक्षेप घेतला. आयोगाने ट्विटर इंडियाला पत्र लिहिले व राहुल गांधींचा हा फोटो हटविण्याच्या सूचना केल्या. विरोधी पक्षाचा एक प्रमुख नेता नऊ वर्षांच्या बलात्कारपीडित मुलीच्या कुटुंबास भेटतो. त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करतो. यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? अन्याय पीडितेचा आक्रोश व्यक्त करायचा नाही अशी लोकशाही व स्वातंत्र्याची नवीन व्याख्या कोणी बनवू पाहात असेल तर तसे स्पष्ट सांगावे.
केंद्र सरकार संवेदनशील नाही व गंभीरही नाही. तीन कृषी कायद्यांवर संसदेत चर्चा व्हावी म्हणून विरोधी पक्ष दोन आठवडय़ांपासून संसदेत मागणी करीत आहे. पेगॅसस हेरगिरी प्रकरणावर सरकार बोलायला तयार नाही. राष्ट्रापुढील गंभीर प्रश्न म्हणून सरकारला हे दोन्ही विषय मान्य नाहीत व दिल्लीच्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात सरकार पक्ष विरोधकांची खिल्ली उडवत आहे.
दिल्लीतील या बलात्कार प्रकरणात काय घडले? बलात्कार झालेल्या मुलीच्या नातेवाईकांवर घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्या मुलीच्या देहाची झालेली राख हाच आता पुरावा उरला आहे. पण या अल्पवयीन ‘निर्भया’चे कोणालाच काही पडलेले नाही.
निर्भया प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत केलेली भाषणे वृत्तवाहिन्यांनी पुन्हा एकदा जनतेसमोर आणायला हवीत. समाज किती सुधारला, किती पुढे गेला याचा मुख्य निकष स्त्री हा असतो. आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक चमक आपल्या महिला खेळाडूंनी दाखवली आहे. महिला सर्वच क्षेत्रांत आज आघाडीवर आहेत.
दुसरीकडे लखनऊच्या रस्त्यावर एका बेफाम झालेल्या मुलीने टॅक्सीचालकास ज्या अमानुष पद्धतीने मारहाण केली ते चित्र धक्कादायक होते. ती मुलगी रस्त्यावर उतरून ‘ओला’ टॅक्सीचालकास निर्घृण पद्धतीने मारहाण करू लागली. ”मी गरीब आहे. माझा दोष काय?” अशी विनवणी करणाऱ्या त्या ड्रायव्हरवरचा हा हल्ला सोशल मीडियावरून देशभरात गेला व त्या मुलीच्या अटकेची मागणी सगळ्यांनीच केली. त्या मुलीचे हे असे अचाट वागणेही बरे नाही.
एका बाजूला त्या अल्पवयीन मुलीच्या बलात्काराचा, हत्येचा धिक्कार सुरू आहे. त्याच वेळी लखनऊच्या मुलीच्या अटकेची मागणी सुरू झाली. स्त्रीची ही दोन रूपे आपल्याच देशात आहेत. राहुल गांधी हे बलात्कारपीडितेच्या कुटुंबांना भेटले तो फोटो ट्विटरवरून हटवा, अशी मागणी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने केली. मग बलात्कारपीडित निर्भयाच्या माता-पित्यांना तेव्हा नरेंद्र मोदीही भेटलेच होते. त्या फोटोला राष्ट्रीय महिला आयोगाने आक्षेप घेतल्याचे दिसत नाही. हे असे आणखी किती काळ चालायचे? बलात्कार, महिला अत्याचारास तरी जात, धर्म आणि राजकीय पक्ष नसावेत… सध्या तसे झाले आहे.
(Sanjay Raut Criticized BJP Over Rahul Gandhi met Delhi Rape Case Victim)
हे ही वाचा :
मोठी बातमी: एकनाथ खडसे आठवडाभरापासून बॉम्बे रुग्णालयात, प्रकृती स्थिर