Sanjay Raut on Agnipath : ‘ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात, देशाचं सैन्य नाही’, संजय राऊतांकडून मोदींवर टीकेचे बाण; उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचं कौतुक
देश पेटलाय. पण महाराष्ट्र शांत आहे कारण या राज्याची सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हातात आहेत, अशा शब्दात राऊतांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलंय.
मुंबई : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरुन (Agnipath Scheme) देशातील काही राज्यात अग्नितांडव पाहायला मिळत आहे. राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणात हिंसक आंदोलन सुरु आहेत. बिहारमध्ये तर रेल्वे गाड्या, रेल्वे स्टेशन, पोलीस ठाण्याला आग लावण्यात आलीय. या परिस्थितीवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्र सरकावर तोफ डागली. शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन आज हॉटेल वेस्ट इनमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray) उपस्थित होते. ‘ठेकेदार पद्धतीने गुलाम नेमले जातात, देशाचं सैन्य नाही. म्हणून अख्ख्या देशात मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात एक अराजक निर्माण झालाय. देश पेटलाय. पण महाराष्ट्र शांत आहे कारण या राज्याची सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हातात आहेत’, अशा शब्दात राऊतांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलंय.
‘जगाच्या पाठीवर कोणत्याही राज्यकर्त्याने असा मूर्ख निर्णय घेतला नसेल’
‘संपूर्ण देश आज पेटलाय. अग्निवीर… काय असतो अग्निवीर? खरे अग्निवीर तर इथे समोर बसले आहेत. तुम्ही कुठल्या अग्निवीरांची भरती करणार आहात. सैन्यात आता कंत्राटी पद्धतीने भरती करणार आहे. सैन्य पोटावर चालतं हे माहिती होतं, पण आता ते कंत्राटावर चालणार आहे. जगाच्या पाठीवर कोणत्याही राज्यकर्त्याने असा मुर्ख निर्णय घेतलेला नाही. ज्या देशात तुघलक होता, त्यानेही असा निर्णय घेतला नाही. पण या देशात चार वर्षाचं, तिन वर्षाचं कंत्राट! देशाची सूरक्षा कुणी करायची हे ज्यांना कळत नाही त्यांच्या हातात आज देशाची सूत्र आहेत. ठेकेदार पद्धतीने गुलाम नेमले जातात, देशाचं सैन्य नाही. म्हणून अख्ख्या देशात मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात एक अराजक निर्माण झालाय. देश पेटलाय. पण महाराष्ट्र शांत आहे कारण या राज्याची सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हातात आहेत. ती सूत्र जोवर आमच्याकडे आहेत तोवर राज्य स्थिर आणि शांत राहिल. अनेक प्रयत्न सुरु आहेत पण तुम्हाला ते जमणार नाही’, असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावलाय.
‘राज्य कसं करायचं हे पाहायचं असेल तर महाराष्ट्रात या’
‘मी काही दिवसांपूर्वी बोललो होतो तेव्हा ती भाजपला झोंबली होती. मी बोललो होतो की या देशाची स्थिती श्रीलंकेसारखी होण्यास फार वेळ लागणार नाही. आणि आज देशात सुशिक्षित, तरुण वर्ग रस्त्यावर उतरलाय. शांतता प्रस्थापित करण्यासाठी बिहारमध्ये सैन्य आणावं लागलं आहे. राज्य कसं करायचं हे पाहायचं असेल तर महाराष्ट्रात या’, असा टोलाही त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला लगावलाय.
‘एक जागा जिंकली म्हणजे तुम्ही जग जिंकलं असं नाही’
राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, निकाल लागला, ठीक आहे एखादी जागा इकडे तिकडे होत असते. आता विधान परिषदेची घालमेल सुरु आहे. मी इतकंच सांगतो एक जागा जिंकली म्हणजे तुम्ही जग जिंकलं असं नाही, महाराष्ट्र जिंकला असं नाही. या राज्याचं सूत्र शिवसेनेकडे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील. फार घमेंड करु नका. अगदी स्पष्ट सांगायचं तेरा घमंड तो चार दिन का है पगले… हमारी बादशाही तो खानदानी है. ती राहणार आणि ती दिसेल. या बादशाहीला नख लावण्याची हिंमत अजून कुणाची नाही.