Sanjay Raut Arrest : संजय राऊतांच्या अटकेविरोधात शिवसेनेची आजही राज्यसभेत प्रचंड घोषणाबाजी; 50 मिनिटासाठी राज्यसभेचं कामकाज तहकूब
Sanjay Raut Arrest : सभापतींच्या मते काँग्रेसचे सदस्य केसी वेणूगोपाल, दीपेंद्र सिंह हुड्डा, भाकपचे विनय विश्वम, शिवसेनेचे अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी आणि आपचे राघव चड्ढा यांनी या नोटीसा दिल्या होत्या.
नवी दिल्ली: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अटकेचा मुद्दा आजही राज्यसभेत गाजला. राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत काल शिवसेना खासदारांनी राज्यसभेत गोंधळ घातला होता. त्यानंतर आजही शिवसेना खासदारांनी राऊतांच्या अटकेच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. मात्र, राज्यसभा सभापतींनी ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे शिवसेना खासदारांनी ईडीच्या (ED) कारवाईच्या निषेधार्थ राज्यसभेत (rajyasabha) जोरदार घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली. त्याला विरोधी पक्षातील इतर सदस्यांनीही साथ दिली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला. राज्यसभा सभापतींना कामकाज करणंही कठिण झालं. त्यामुळे त्यांनी अखेर राज्यसभेचं कामकाज 50 मिनिटासाठी तहकूब केलं. यावेळी राज्यसभेत महागाईचा मुद्दाही गाजला.
राज्यसभेचं काकाज सुरू होताच सभापती व्यंकय्या नायडू यांनी हरियाणातून विजयी झालेले भाजपचे सदस्य कृष्णलाल पवार आणि कार्तिकेय शर्मा यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर त्यांनी पटलावर काही दस्ताऐवज ठेवले. यावेळी सभापती नायडू म्हणाले की, मला 267 नुसार काही नोटीस मिळाल्या आहेत. त्यांचा स्वीकार करण्यात आलेला नाही. ज्या सदस्यांनी या नोटिसा दिल्या आहेत. ते विविध चर्चांच्यावेळी आपले मुद्दे उचलू शकतात.
देसाई, चतुर्वेदी आक्रमक
सभापतींच्या मते काँग्रेसचे सदस्य केसी वेणूगोपाल, दीपेंद्र सिंह हुड्डा, भाकपचे विनय विश्वम, शिवसेनेचे अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी आणि आपचे राघव चड्ढा यांनी या नोटीसा दिल्या होत्या. सभापती नायडू यांनी निवेदन दिल्यानंतर शिवसेनेच्या सदस्यांनी राऊत यांच्या घरावर ईडीने मारलेल्या छाप्याच्या स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, सभापतींनी त्यांना चर्चेला परवानगी देण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेनेचे खासदार अधिकच आक्रमक झाले. त्यांनी घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली. शिवसेनेच्या या मागणीचं इतर विरोधी पक्षांनीही समर्थन केलं. तसेच राऊत यांच्या अटकेच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी या सदस्यांनीही केली. तर इतर सदस्यांनी महागाई आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्याची विनंती सभापतींना करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शिवसेना आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्याने अखेर सभापतींना कामकाज तहकूब करावं लागलं. सभापती नायडू यांनी 11 वाजून 8 मिनिटांनी दुपारी 12 वाजेपर्यंत म्हणजे 52 मिनिटासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब केलं.
आसनाबाहेर येऊन घोषणाबाजी
शिवसेना खासदारांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेवर चर्चा करण्याची मागणी केली. ती फेटाळून लावल्याने शिवसेनेचे खासदार आसन सोडून बाहेर आले आणि त्यांनी जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याला इतर विरोधी पक्षांची साथ मिळाली. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. परिणामी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं.