मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीनं ताब्यात घेतलंय. पत्राचाळ प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे. आज सकाळीच ईडीचे अधिकारी (ED Officers) संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले. तब्बल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर (ED Inquiry) संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलंय. साधारण दुपारी चार वाजता संजय राऊतांना घेऊन ईडीचे अधिकारी त्यांच्या घरातून बाहेर पडले. त्यावेळी संजय राऊत आपल्या नेहमीच्या आक्रमक आणि करारी मुद्रेतच पाहायला मिळाले. राऊत बाहेर आले त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर करारीपणा कायम होता. तसंच त्यांनी खांद्यावर भगवा गमजा घेतला होता आणि तो माध्यमांसमोर आणि उपस्थित शिवसैनिकांसमोर त्यांनी तो हवेत भिरकावत आपण घाबरलो नसल्याचं सांगितलं.
साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर साडे चार वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत संजय राऊत आपल्या निवासस्थानाबाहेर आले. त्यावेळी त्यांनी उपस्थित शेकडो शिवसैनिकांना अभिवादन केलं. हात उंचावत त्यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. इतकंच नाही तर गळ्यात असलेलं भगवं उपरणं ही त्यांनी बराच वेळ हवेत भिरकावलं. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आक्रमक भाव आपण सगळ्या कारवाईला समोरं जाण्यास तयार असल्याचंच सांगत होता. गाडीच्या बाहेर येत त्यांनी शिवसैनिकांना हात जोडून अभिवादन केलं आणि पुन्हा एकदा भगवं उपरणं हातात घेऊन हवेत फिरवलं.
मी बाळासाहेब ठाकरे यांचा एक सच्चा शिवसैनिक आहे. मी लढणार, आम्ही लढू. महाराष्ट्र इतका कमजोर नाहीये आणि शिवसेना इतकी कमजोर नाहीये. विरोधकांना दाखवून देऊ शिवसेना काय आहे. हा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठीचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा, अशा शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर निशाणा साधला. त्याचबरोबर सगळ्यांना माहिती आहे की हे काय लेव्हलचा राजकारण सुरू आहे. हे शिवसेनेला कमजोर करण्याचे प्रयत्न आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे की संजय राऊत यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. मात्र संजय राऊत शिवसेना सोडणार नाही आणि महाराष्ट्राची बेईमानी करणार नाही. मला अटक करायला निघालेले आहेत आणि मी अटक करून घेतोय, असंही संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.