Sanjay Raut Bail : संजय राऊत यांना जामीन मंजूर होताच आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना दिलासा मिळताच काय म्हणाले आदित्य ठाकरे?
सोलापूर : शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut bail News) यांना जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray On Sanjay Raut Bail) यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. ते सोलापुरात (Solapur) पत्रकारांशी बोलत होते. तोफ पुन्हा एकदा रणांगणात आली आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला.
‘संजय राऊत हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते उगाच नाव लावून फिरत नाहीत, त्यांनी मुखवटा लावलेला नाही. हे बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक आहेत’, असंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, सरकारविरोधात बोलणाऱ्यांना कसं अडकवलं जातंय, यावरुनही आदित्य ठाकरेंनी यावेळी निशाणा साधला. दबावतंत्र वापरुन, यंत्रणांची मदत घेऊन आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात असल्याच आरोप आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा केला. यावेळी त्यांनी भाजप सरकार हुकुमशाही करत असल्याचाही घणाघाती आरोप केला.
पाहा व्हिडीओ :
आदित्य ठाकरे यांनी पुढे असंही म्हटलं की,…
संजय राऊत डरपोक नाहीत. संजय राऊत हे गद्दार नाहीत. संजय राऊत यांच्याविरोधातही दबाव तंत्र वापरण्यात आलं होतं. पण ते पळून गेले नाहीत. आज राजकीय लोकांवर दबावतंत्र वापरुन कारवाई होतेय. उद्या पत्रकारांवर, लोकांवरही अशाच प्रकारे कारवाई होऊ शकते. ही धोक्याची घंटा आहे.
102 दिवसांच्या कोठडीनंतर अखेर संजय राऊत यांनी विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. याआधीही संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. पण त्यांना दिलासा मिळाला नव्हता.
अखेर विशेष पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केलाय. तर दुसरीकडे ईडीने मात्र संजय राऊत यांना जामीन मंजूर करु नये, अशी मागणी केली आहे.