Sanjay Raut | संजय राऊतांना भेटण्यास जेल प्रशासनाची मनाई, शिवसेना नेत्यांसह सुनील राऊतांनाही परवानगी नाकारली
संजय राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत म्हणजेच आणखी 12 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवले जाईल. दरम्यान शिवसेना नेते आणि राऊतांचे बंधू सुनील राऊत हे संजय राऊतांच्या जामीनासाठी प्रयत्न करत आहेत.
मुंबईः न्यायालयीन कोठडीत असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिवसेना नेत्यांना तसेच बंधू सुनील राऊत (Sunil Raut) यांनाही जेल प्रशासनाने भेटीची परवानगी दिली नाही. संजय राऊत सध्या आर्थर रोड तुरुंगात (Arthur road Jail) आहेत. कारागृह प्रशासनाने या नेत्यांना राऊतांना भेटण्यासाठी मनाई केली. आज सकाळी संजय राऊत यांचे धाकटे बंधू -शिवसेना आमदार सुनील राऊत आणि शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई संजय राऊत यांना भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात गेले होते. मात्र तुरुंग प्रशासाने त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे पत्रावाला चाळ प्रकरणातील एक आरोपी आहेत. 8 ऑगस्टपर्यंत त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता ED कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलीय. ते सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत…
परवानगी नाकारली पुढे काय?
संजय राऊत यांच्यावर केलेले आरोप खोटे असून अखेर सत्याचाच विजय होईल, असं वक्तव्य त्यांचे बंधू सुनिल राऊत यांनी केलंय. तसेच आर्थर रोड कारागृह प्रशासानाने आज संजय राऊत यांना भेटण्यासाठी परवानगी नाकारली तरीही न्यायालयाकडून रीतसर परवानगी आणल्यानंतर संजय राऊत यांना भेटण्यास दिले जाईल असे सुनील राऊत आणि अनिल देसाई यांना कारागृह प्रशासनाने सांगितले.
सुनील राऊत काय म्हणाले?
आर्थर रोड तुरुंग प्रशासनाने संजय राऊत यांची भेट नाकारल्यानंतरही सुनील राऊत यांनी आमचाच विजय होईल, अशी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ कोर्टाची लढाई आम्ही सुरु केली आहे. 22 तारखेपर्यंत मुदत आहे. वकिलांशी भेटून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ… तसेच संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातून अग्रलेख लिहिण्यावरही ईडीने आक्षेप घेतलाय. यावरून सुनील राऊत म्हणाले, ‘ ते काहीही करू शकतात. सज्जन माणसाला अडकवू शकतात. चांगल्या माणसाची जिंदगी बरबाद करू शकतात. त्यांच्याकडून याच अपेक्षा आहे. सत्य परेशान हो सकता है.. पण पराजित नाही. एक वरची शक्ती काम करत असते. त्यामुळे हे जे काही चाललंय आमच्या विरोधात हे सर्व एक दिवस उलटं फिरेल, असा इशारा सुनील राऊत यांनी दिला.
राऊतांना जामीन मिळणार का?
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 08 ऑगस्ट रोजी त्यांची ईडी कोठडी संपली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने राऊत यांची आणखी काही दिवस कोठडी मागितली होती. मात्र राऊतांच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. संजय राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत म्हणजेच आणखी 12 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवले जाईल. दरम्यान शिवसेना नेते आणि राऊतांचे बंधू सुनील राऊत हे संजय राऊतांच्या जामीनासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी वकिलांशी सल्लामसलत केली जात आहे. त्यामुळे राऊतांना जामीन मिळणार का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.