ठाकरे गटात संजय राऊतच पॉवरफुल्ल, आदित्य ठाकरे यांचे काय?
संजय राऊत एकीकडे भाजप आणि शिंदे गटाला अंगावर घेत होते. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत भाजप विरोधातील पक्षांना एकत्र आणण्याचे काम करत होते. मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीचे यजमानपद हे ठाकरे गटाकडेच होते.
मुंबई | 27 नोव्हेंबर 2023 : स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्या हाती सोपवली. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या कारकीर्दीतच शिवसेनेचे दोन भाग झाले. एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट आणि दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला. अजूनही ही गळती सुरूच आहे. अशातच ठाकरे यांनी आपल्यासोबत असलेल्या नेत्यांची नवी फळी तयार केली. नवे नेते, उपनेते, संपर्क प्रमुख अशी यादी जाहीर केली. आता या नेत्यांवर उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची जिल्हानिहाय जबाबदारी सोपविली आहे. परंतु, या नेत्यांमध्ये मुख्य प्रवक्ते, खासदार संजय राऊत हेच पॉवरफुल्ल असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षाच्या काळात संजय राऊत यांनी भाजपवर सातत्याने शाब्दिक हल्ला केला. मात्र, भाजपने एकनाथ शिंदे यांनाच गळाला लावले आणि मुख्यमंत्री केले. याच काळात संजय राऊत यांच्यावर कोविड घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. पत्रा चाळ प्रकरण बाहेर काढून त्यांना जेलमध्ये पाठवले. ईडी कारवाई केली. मात्र, संजय राऊत त्याला बधले नाहीत. जेलमधून बाहेर येताच त्यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल सुरु केला.
शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षात महत्वाचे असे मानले जाणारे खासदार गजानन किर्तीकर, रामदास कदम, आनंदराव अडसूळ हे नेते गेले. तर, सुभाष देसाई, अनंत गीते, मनोहर जोशी, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे नेते ठाकरे यांच्यासोबत राहिले. पक्षाच्या घटनेनुसार दोन्ही गटांनी आपापल्या गटाच्या उपनेते, नेते पदाची यादी जाहीर केली.
संजय राऊत एकीकडे भाजप आणि शिंदे गटाला अंगावर घेत होते. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत भाजप विरोधातील पक्षांना एकत्र आणण्याचे काम करत होते. त्यामुळेच देशातील प्रमुख अशा 24 पक्षांची इंडिया आघाडी तयार झाली. मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीचे यजमानपद हे ठाकरे गटाकडेच होते. त्याची पूर्ण जबाबदारी संजय राऊत यांनीच घेतली होती.
पक्ष फुटीनंतर शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. पण, याच काळात संजय राऊत हे जेलमध्ये होते. परंतु, संजय राऊत यांच्या नावाची रिकामी खुर्ची ठेवून उद्धव ठाकरे यांनी पक्षातील त्यांचे महत्व अधोरेखित केल होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर जोर दिलाय. उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे, अनंत गीते, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, राजन विचारे, अरविंद सावंत, अनिल देसाई यांच्यासह आमदार भास्कर जाधव, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, अनिल परब अशी नव्या नेत्याची यादी जाहीर केली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरे गटाने जानेवारी महिन्यात राज्यव्यापी शिबिर घेण्याचं ठरवलं आहे. हे शिबीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करून जाहीर सभा घेणार आहेत. त्याच्या नियोजनाची तयारी सुरु आहे. अशातच ठाकरे यांनी विभागीय नेते जाहीर केलेत. महत्वाच्या असा दहा नेत्यांवर ही जबाबदारी देण्यात आलीय.
ठाकरे यांनी दहा नेत्यांवर ही जबाबदारी दिली आहे. त्यामध्ये संजय राऊत यांना महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसभा मतदार संघाची जबाबदारी दिलीय. संजय राऊत यांच्याकडे ठाकरे यांनी नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी, पुणे, शिरूर, बारामती, मावळ अशा तब्बल १२ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलीय. तर अन्य नेत्यांकडे चार ते पाच लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलीय. यामुळे ठाकरे गटामध्ये संजय राऊत हेच पॉवरफुल्ल नेते असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.
आदित्य ठाकरे यांच्याकडे काय?
माजी पर्यावरण मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे ही ठाकरे गटाचे नेते आहेत. मात्र, त्यांच्याकडे कोणताही लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच आदित्य ठाकरे हे पक्षाचे स्टार प्रचारक असणार आहेत. या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याची प्रमुख जबाबदारी आदित्य यांच्यावर असणार आहे.