वेश बदलून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी सरकार पाडलं, संजय राऊतांचा निशाणा
Sanjay Raut: वेश बदलून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी सरकार पाडलं, 'या राजकारणातल्या कलाकारांनी...', संजय राऊत यांनी साधला निशाणा

सत्तेत सामिल होण्यापूर्वी अजित पवार यांनी अनेकदा अमित शहा यांची गुप्त भेट घेतली. जवळपास 10 वेळी भेटी झाल्या. मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीत जायचे आणि विमानाचं तिकिट बूक करताना देखील ए.ए.पवार या नावाने विमानाचं तिकिट बूक करायचे… अशी धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या गौप्यस्फोटावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. वेशांतर करूनच या दोघांनी सरकारे पाडली. एकनाथ शिंदे तर भाजपची सत्ता नसतानाही वेशांतर करून काँग्रेस नेत्यांना भेटायचे, असा आरोपच संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा घणाघाती हल्ला केला आहे. महाराष्ट्रात रंगमंच, नाटकाची फार मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या रंगमंचानं अनेक मोठ-मोठे कलाकार दिले आहेत. अगदी बाल गंधर्व यांच्यापासून श्रीराम लागू यांच्यापर्यंत… नाना पाटेकर, प्रशांत दामले यांचं काम देखील आपण पाहतो. अनेक मोठे कलाकार महाराष्ट्राने दिले आहेत. त्या नाट्यसृष्टीने अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसत आहे. यांना देखील रंगमंचावर नाटकात सहभागी करून घेतलं पाहिजे.कारण इतक्या उत्तम पद्धतीत ते मेकअप करतात… इतक्या उत्तम पद्धतीने आपले चेहरे बदलतात… इतक्या उत्तम पद्धतीने फिरत्या रंगमंचावर काम करतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीचं नुकसान केलंय
‘अजित पवार यांना पाहा… एखाद्या गुप्तहेराप्रमाणे नाव बदलून, टोप्या बदलून, खोट्या पिळदार मिश्या लावून दिल्लीत अमित शाह यांना भेटायला जात होते. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे रात्री 12 नंतर वेश बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईट खाली बसून सरकार कसं पाडायचं यावर चर्चा करत होते आणि लोक आम्हाला ओळखत नव्हते असे ते म्हणतात. म्हणजे त्यांनी किती हुबेहूब मेकअप केला होता. ही फार मोठी गोष्ट आहे, या राजकारणातल्या कलाकारांनी मराठी नाट्यसृष्टीचं आणि आपल्या चित्रपटाचं फार मोठं नुकसान केलं आहे,’ असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.
मला प्रसंग चांगले माहीत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही संजय राऊत यांनी हल्ला चढवला आहे. ‘एकनाथ शिंदे आता सिनेमा काढत आहेत खोट्या कथा लिहुन, त्यांनी स्वतःवर जे नाटक रचलं होतं, त्यांना एखादा नाटक, सिनेमा लिहिता येत नसेल, तर मी उत्तम लेखक आहे. मी लिहितो आणि घडलेले प्रसंग मला त्यांच्यापेक्षा जास्त चांगले माहिती आहेत, असं ते म्हणाले.
शिंदे पटेलांना भेटायचे
‘एकनाथ शिंदे हे आतापासून वेश बदलून जात नव्हते तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे वेश बदलून अहमद पटेलांची भेट घ्यायचे… जेव्हा भाजपचं राज्य नव्हतं काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा देखील शिंदे अहमद पटेलांना कसे भेटायला जात होते, हे पृथ्वीराज चव्हाण उत्तम प्रकारे सांगू शकतात, असा आरोपही त्यांनी केला.