मुंबई : पाकिस्तान, बांगलादेशातील हिंदू यातना भोगीत असतानाच बाजूच्या अफगाणिस्तानातही तालिबान्यांनी हिंदू व शीख समाजावर निर्घृण हल्ले सुरू केले आहेत. मंदिरे, गुरुद्वारात घुसून विध्वंस केला जात आहे. याची फक्त दखल घेऊन किंवा निषेध करुनच भागणार नाही, तर शेजारी राष्ट्रांतील हिंदू-शिखांना आधार वाटेल असा एखादा दणका देणे गरजेचे आहे. मोदी-शहाजी आपल्या मजबूत इराद्यांची जगभरात चर्चा आहे. भाईबंदांच्या रक्षणासाठी कठोर पावलं उचला, अशी विनंती आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
तिन्ही राष्ट्रांतले हिंदू तेथे परंपरेने, पिढ्यान् पिढ्या राहात आहेत. ते आक्रमक नाहीत व अतिरेकी नाहीत. त्यांच्या मागण्याही नाहीत, पण शेजारच्या तिन्ही राष्ट्रांतील धर्मांध अतिरेकी त्यांना समूळ खतम करू पाहत आहेत. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांनी हिंदूंची ही पिछेहाट व दुर्दशा थांबवावी. आपल्या मजबूत इराद्यांची जगभरात चर्चा आहे. म्हणूनच शेजार राष्ट्रांतील आपल्या भाईबंदांच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलावीत, अशी विनंती अग्रलेखातून करण्यात आली आहे.
मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हा एक मजबूत देश बनला आहे, असा दावा भाजपातील कडवट मोदीभक्त नेहमीच करीत असतात. त्यात काहीच चुकीचे नाही. मोदी यांच्या ‘शक्तिमान’ प्रतिमेमुळे तसेच गृहमंत्री शहा यांच्या ‘बाहुबली’ कार्यपद्धतीमुळे देशातील व देशाबाहेरील अतिरेकी प्रवृत्ती भारताला टरकून असल्याचेही सांगितले जाते, पण गेल्या काही दिवसांत शेजारी राष्ट्रांत तसेच जम्मू-कश्मीर खोऱ्यात हिंदू आणि शिखांवरील हल्ले वाढले आहेत. त्यांच्याकडे फक्त हिंदू किंवा शीख म्हणून न पाहता आपल्या रक्ताची माणसे म्हणून पाहायला हवे. कश्मीरात अतिरेकी कारवायांनी पुन्हा फणा काढला आहे.
भारतीय जनता पक्षाचे एक सरपंच व त्यांच्या पत्नीची अतिरेक्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. अनंतनागमधील घरात घुसून गुलाम रसुल दार व पत्नी जव्हारा बेगम यांना ठार केले. हो दोघेही राष्ट्रवादी मुस्लिम होते व त्यांच्या घरावर तिरंगा फडकत होता. गेल्या काही महिन्यांपासून खोऱ्यात भाजपसंबंधित लोकांवर हल्ले वाढले आहेत व ही खरोखरच चिंतेची बाब आहे.
खोऱ्यात अतिरेक्यांचा हा असा वावर वाढला असेल तर गुप्तचर यंत्रणा काय करतात? सरकारने ‘पेगॅसस’ स्पाय यंत्रणांचा वापर राजकीय विरोधकांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी केला आहे. त्याऐवजी त्याचा उपयोग अतिरेकी यंत्रणांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी केला तर कश्मीर खोऱयातील असंख्य निरपराध्यांचे प्राण वाचतील. 370 कलम हटवूनही खोऱ्यातले वातावरण शांत झालेले नाही व हजारो कश्मिरी पंडितांच्या घरवापसीचे वचन सरकार पूर्ण करु शकलेले नाही. पंडितांना भीती वाटते की, खोऱ्यातील अतिरेकी त्यांना सुखाने जगू देणार नाहीत. म्हणून अतिरेक्यांच्या मागे ‘पेगॅसस’ पाळत यंत्रणा लावून पंडितांच्या जिवाचे रक्षण केले पाहिजे. .
कश्मीरातील शांतता ही वरवरची आहे व अतिरेकी संघटना संधी मिळताच डोके वर काढून लोकांना ठार करतात. गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी हे आव्हान आहे. हे झाले देशातील नागरिकांचे हाल, पण शेजारी राष्ट्रांतही हिंदू-शीख वगैरे आपल्या भाईबंदांचे जगणे कठीण झाले आहे. पाकिस्तान, बांगलादेशात हिंदू समाज अल्पसंख्याक आहे व त्यांचे जगणे म्हणजे नरक यातनाच ठरत आहेत.
भारतात एक मजबूत हिंदू शासक सत्तेवर असताना शेजारच्याच देशातील हिंदूंचे असे पलायन अस्वस्थ करणारे आहे. पाकिस्तानातील उरल्या-सुरल्या हिंदूंनी देश सोडून जावे यासाठीच तेथील धर्मांध लोक व त्यांच्या संघटना असे हल्ले करीत आहेत. एकतर पळून जा किंवा धर्मांतर करा, असा पर्याय ठेवला जातो. याची दखल येथील मोदी सरकारने घेणे गरजेचे आहे.
पाकिस्तानातील हिंदूंना सन्मानाने जगणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. इकडे भारतात आत्मनिर्भर, आत्मसन्मानावर जोर दिला जात असतानाच बाजूच्या राष्ट्रांतील आपले भाईबंद रोज मरणयातना भोगीत दिवस कंठीत आहेत. पाकिस्तानातील हिंदू मुलींना उचलून किंवा पळवून नेऊन त्यांचा एखाद्या गैर हिंदूशी निकाह लावणे आता रोजचेच झाले आहे. जे पाकिस्तानात तोच प्रकार बांगलादेशात. बांगलादेशाची स्थापना हिंदुस्थानमुळेच झाली, पण तेथे आज सगळयात जास्त खतरा हिंदू समाजास आहे.
तेथील हिंदूंनाही काहीच भवितव्य नाही. बांगलादेशातही हिंदू मंदिरांवर व हिंदू समाजावर हल्ले सुरूच आहेत. प. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या पंतप्रधानांनी बांगलादेश दौरा केला. दोन देशांच्या मैत्रीचे गोडवे गायले. तेथील हिंदू समाजानेही पंतप्रधान मोदींचे मनापासून स्वागत केले, पण मोदींची पाठ वळताच तेथील मंदिरांवर पुन्हा हल्ले सुरू झाले.
(Sanjay Raut on pakistan Afganistan Bangaladesh Hindu Community Saamana Editorial)
हे ही वाचा :
मुंबईकरांनो, लोकलने प्रवास करायचाय?, मग हे 10 नियम वाचा आणि असा मिळवा पास…!
बुधवारपासून रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीशेजारी महापालिकेचे स्टॉल्स, लोकलचा पास देण्यासाठी तयारी