महाविकास आघाडीचं ठरलं? संजय राऊत यांनी बैठकीनंतर आतली बातमी सांगितली
महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज पुन्हा जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे देखील सहभागी झाले. या बैठकीनंतर संजय राऊतांनी बैठकीत नेमकं काय ठरलं, याबाबत माहिती दिली.
मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : महाविकास आघाडीची आज ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी नेमकी काय-काय चर्चा झाली याविषयी माहिती दिली. “वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तसेच पुढची दिशा ठरली. यावेळी अनेक विषयांवर चांगली चर्चा झाली. मुख्य म्हणजे सकारात्मक चर्चा झाली. आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत की, आपण एकत्र राहून काम करायचं आहे. निवडणुकींना सामोरं जायचं आहे आणि देशात जे संविधान विरोधी वातावरण निर्माण केलं आहे, म्हणजे संविधान खतम करायचं जे सुरु आहे ते आपल्याला बंद करायचं आहे. भाजपला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत होईल अशी कोणतीही पावलं उचलणार नाही. याविषयी आमचं एकमत झालं आहे”, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
“महाराष्ट्राचं राजकारण सध्या ज्या पद्धतीने गटांगळ्या खात आहे, देशातलं सध्याचं हुकूमशाही, एकाधिकारशाही आणि फसवणुकीचं जे वातावरण सुरु आहे ते बदलण्यासाठी आम्हाला एकत्र राहणं गरजेचं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या अनेक विषयांच्या ज्या भूमिका आहेत त्यावर आम्ही सविस्तर चर्चा करुन आणखी लवकरच भेटणार आहोत”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
‘आमच्यामध्ये फार मतभेद नाहीत’
“जागावाटपांवर चर्चा सुरु आहे. आमच्यासाठी जागावाटप हा इशू नाही. भाजपचा पराभव ही प्राथमिकता आहे, त्यानंतर जागावाटप. पहिली प्राथमिकता ही भारतीय जनता पक्षाचा पराभव आहे. जागावाटपाची चर्चा सुरु आहे. आमच्यामध्ये फार मतभेद नाहीत”, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं. “आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रॅमसाठी एका ग्रुपची तयारी करतोय जे हा प्रोग्रॅम आणि एक जाहीरनामा तयार करतील. त्यात महत्त्वाचे विषय घेतले जातील. त्या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्या काही सूचना आहेत. सामाजिक, शेतकरी, कष्टकरी यांचा समावेश आमच्या कार्यक्रमात केला जाईल”, असं राऊतांनी सांगितलं.
‘इंडिया आघाडीत फूट नाही’, राऊतांचा दावा
“इंडिया आघाडी या देशात काम करत आहे. आघाडीतले काही निर्णय आहेत, त्यांना आपण स्ट्रॅटेजिक मुव्हमेंट आहेत. पश्चिम बंगाल, पंजाबमध्ये वेगळे निर्णय घेतले जात आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस भाजपचा पराभव करायला समर्थ आहेत. पंजाबमध्ये आप समर्थ आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीत आहेत. त्या बाहेर पडल्या नाहीत. जागावाटपात काही विषय झाला असेल. पण त्या इंडिया आघाडीत आहेत. बहुतेक पुढची बैठक स्वत: ममता बॅनर्जी बोलवत आहेत”, असा दावा संजय राऊतांनी केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “त्यांनी ठरवायला पाहिजे, महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांबरोबर जायतं, मुंबईची लूट करणाऱ्यांबरोबर जायचं की महाराष्ट्र एकसंघ ठेव्याचा विचार असणाऱ्यांसोबत राहायचं”, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.