मुंबई: काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांची काल ईडीकडून (ED) चौकशी झाली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती ईडीने जप्त केली. तसेच शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांना स्वत:लाही ईडीने समन्स बजावलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करतात ते सर्वांना माहीत आहे. आम्ही सर्व विरोधी पक्ष देश हितासाठी प्रश्न विचारत आहोत. सातत्याने अन्यायाविरोधात आवाज उठवत आहोत. पण आमचा आवाज दाबण्यासाठी चौकशी होत आहे. सोनिय गांधी, राहुल गांधी किंवा मी कोणी असो जो सवाल विचारेल. त्याला धमकावलं जातंय. दबाव आणला जातोय, तुरुंगात टाकलं जाण्याची धमकी दिली जातेय. पण आम्ही या सर्वासाठी तयार आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
सोनिया गांधी आजारी आहेत. त्यांना परत बोलावलं. प्रफुल पटेलांवरही कारवाई झाली. मलाही नोटीस आली. केंद्रीय तपास यंत्रणांवर राजकीय दबाव आहे. जे महाराष्ट्रात लढत आहेत. त्यांच्यावर दबाव सुरू आहे. संविधानाच्या सत्य आणि न्यायासाठी आम्हाला मोठा लढा द्यावा लागेल, असं राऊत म्हणाले.
देशाच्या राष्ट्रपतीपदावर द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या आहेत. त्यांना देशभरातून मोठं मतदान झालं. त्यात शिवसेनेचाही खारीचा वाटा आहे. देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. त्या संविधानाच्या चौकीदार आहेत. त्यांनी संविधानाचं रक्षण करावं. दलित आदिवासींना न्याय देण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. ही जबाबदारी त्यांनी पार पाडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांना ठाण्यात प्रचंड प्रतिसाद मिलाला. भिवंडी, कर्जतमध्येही त्यांचं जल्लोषात स्वागत झालं. जिकडे जातात तिकडे त्यांना तरुणांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळतोय. आम्ही शिवसेनेच्या सोबतच राहू, असं आश्वासन शिवसैनिक देत आहेत. घोषणा देत आहेत. भविष्यातही महाराष्ट्राचं वातावरण असंच शिवसेनामय झाल्याचं दिसेल, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, आदित्य ठाकरे सध्या नाशिकमध्ये आहेत. आज ते मनमाडमध्ये मेळावा घेणार आहेत. यावेळी बंडखोर आमदार सुहास कांदे हे त्यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारणार आहेत. त्याबाबत राऊत यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. तर, सुहास कांदे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या प्रश्नांची आदित्य ठाकरेंनी उत्तरे दिल्यास तात्काळ आमदारकीचा राजीनामा देऊ असं आव्हानच कांदे यांनी दिलं. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि कांदे यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.