Sanjay Raut | शिवसेना म्हणजे युक्रेन नाही, कोणताही गट पक्षाला ताब्यात घेऊ शकणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य
शिंदे गट म्हणजेच खरी शिवसेना की उद्धव ठाकरेंची खरी शिवसेना, याचा निर्णय पुढील काही दिवसात होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्लीः शिवसेनेला (Shivsena) तोडण्याची भाषा करणाऱ्यांना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज थेट सुनावलं. शिवसेना म्हणजे युक्रेन (Ukraine) नाही. कोणताही गट शिवसेनेला अशा प्रकारे ताब्यात घेऊ शकत नाही. विधीमंडळात शिवसेना कमजोत झाली असेल. पण महाराष्ट्राच्या गावा-गावात, शहरा शहरात शिवसेना मजबुतीने उभी आहे, असं राऊतांनी ठामपणे सांगितलं. संजय राऊत यांनी आज दिल्लीतून पत्रकारांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांच्या गटाने आमचाच पक्ष हा शिवसेना असल्याचा दावा केला आहे. विधानसभेतील दोन तृतीयांश आमदार शिंदे गटाकडून असल्याने आमचाच पक्ष खरी शिवसेना आहे, असं शिंदेगटाकडून म्हटलं जात आहे. कालच विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड झाली. त्यामुळे आता शिंदे गट म्हणजेच खरी शिवसेना की उद्धव ठाकरेंची खरी शिवसेना, याचा निर्णय पुढील काही दिवसात होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
शिंदे गटाच्या दाव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ शिवसेना ही काही युक्रेन नाही. असा कोणताही गट शिवसेना ताबा्यत घेत नाही. विधीमंडळात शिवसेना कमजोर झाली असेल पण महाराष्ट्र, ग्रामीण भागात, शहरा-शहरात आजही तीच आहे. काही लोक सोडून गेले म्हणजे शिवसेना कमजोर झाली असं होत नाही. बाळासाहेब ठाकरंचा हा अवमान आहे. विधीमंडळात नक्कीच एक फूट पडली आहे. काही मंडळींनी भूमिका घेतलेली आहे. ही भूमिका त्यंनी का घेतली, हा प्रश्न त्यांनाही पडला असेल. ज्या पद्धतीने सभागृहात ईडी ईडीच्या गर्जना सुरु होत्या. त्यावरून आपल्याला कळलं असेल. त्यामुळे खालपासून वरपर्यंत हा निर्णय का घेण्यात आला, ते कळलं असेल. अशा अनेक प्रसंगातून आम्ही गेलेलो आहोत. हा पक्ष पुन्हा पुन्हा फोडण्याचा प्रयत्न होतो आणि त्यातून शिवसेना उभी राहतो. जोपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्रात शिवसेना मजबुतीने उभी आहे, तोपर्यंत दिल्लीचे जे इरादे आहेत, मराठी माणसाच्या हातून महाराष्ट्र तोडण्याचे मुंबई तोडण्याचे जे इरादे आहेत. ते त्यांना शक्य नाही, असा इशारा संजय राऊतांनी दिला.
मध्यावधी निवडणुका होऊ शकतात…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशात मध्यवधी निवडणुका होऊ शकतात, सर्व आमदारांनी त्याची तयारी ठेवावी, असं म्हटलंय. संजय राऊत यांनीही याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, ‘ शरद पवार जे म्हणत आहेत, त्यानुसार मध्यावधी निवडणुकांचा महाराष्ट्राला सामोरं जावं लागेल. भाजपने केलेली ही तात्पुरती तजवीज आहे. गुजरातसोबत महाराष्ट्रातही निवडणुका होऊ शकतात, अशी माझी माहिती आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलंय.