फडणवीसांची स्तुती, पोलिसांवर ‘बाह्यशक्तीं’चं नियंत्रण आणि अंबानींच्या हेलिपॅडसाठी कट…? संजय राऊत यांचं स्फोटक ‘रोखठोक’!

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराखाली स्फोटके सापडल्यानंतर स्कॉर्पिओचा मालक मुनसुख हिरेन यांचा संशायस्पद मृत्यू झाला. (sanjay raut reaction on mansukh hiren death case )

फडणवीसांची स्तुती, पोलिसांवर 'बाह्यशक्तीं'चं नियंत्रण आणि अंबानींच्या हेलिपॅडसाठी कट...? संजय राऊत यांचं स्फोटक 'रोखठोक'!
Sanjay Raut
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 12:40 PM

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराखाली स्फोटके सापडल्यानंतर स्कॉर्पिओचा मालक मुनसुख हिरेन यांचा संशायस्पद मृत्यू झाला. या सर्व प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’मधून स्फोटक भाष्य केलं आहे. या ‘रोखठोक’मधून राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांची वरेमाप स्तुती करतानाच पोलिसांवर असणारं बाह्यशक्तीचं नियंत्रण… त्यातून संभाव्य सौम्य टोळी युद्धाचा निर्माण झालेला धोका आणि अंबानीना त्यांच्या घरावर हेलिपॅड उभारण्यासाठी भाजपने रचलेला स्फोटकांचा बनाव… आदी मुद्द्यांवर राऊत यांनी परखड मतं व्यक्त केली आहेत. (sanjay raut reaction on mansukh hiren death case )

हे शुभसंकेत नाहीत

अंबानी परिवाराच्या घराबाहेर एक संशयास्पद गाडी उभी राहते, त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू लगेच होतो, विधानसभेत त्यावर चार दिवस गदारोळ होतो हे सर्व रहस्यमय प्रकरण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढत आहे. या सर्व प्रकरणातील गुप्त माहिती विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याकडे सगळय़ात आधी पोहोचत राहिली. सरकारसाठी हे शुभसंकेत नाहीत, असं रोखठोकच्या सुरुवातीलाच राऊत यांनी म्हटलं आहे.

मुगंटीवारांचा फाजील आत्मविश्वास

मनसुख हिरेन या व्यावसायिकाच्या मृत्यूने महाराष्ट्राचे राजकारण सध्या ढवळून निघाले. त्या ढवळण्यातून विरोधी पक्षाने काय मिळवले, याचे उत्तर ‘गमावलेला आत्मविश्वास’ असेच द्यावे लागेल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दीड वर्षात प्रथमच विरोधी पक्षनेता म्हणून सूर सापडला. आठ दिवसांच्या अधिवेशनात संपूर्ण ‘फोकस’ विरोधी पक्षनेत्यांवर राहिला हे सगळ्यात मोठे यश. बुधवारी दुपारी सुधीर मुनगंटीवार सभागृहात आले व म्हणाले, ”पुढच्या तीन महिन्यांत आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ.” हा फाजील आत्मविश्वास आहे, सरळ स्वप्नरंजन आहे. पुन्हा सत्तेवर येण्याची भाषा म्हणजे पुन्हा पहाटे किंवा मध्यरात्रीच्या शपथविधीची तयारी. त्यासाठी नवा घोडेबाजार होणार असेल तर भारतीय जनता पक्ष आपली उरलीसुरली प्रतिष्ठाही गमावून बसेल, अशी टीका त्यांनी केली आहे.

वाझेंचा बळी मिळवला, पण डेलकर प्रकरणाचं काय?

महाराष्ट्रात सध्या जे घडते आहे ते राज्याच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही. खून, आत्महत्या, मृत्यू, बलात्कार यावर सत्ताधारी आणि विरोधकांत रणकंदन सुरू आहे. पूजा चव्हाण या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. मनसुख हिरेन याचा मृत्यू हा खून असल्याचे सांगून विरोधी पक्षाने सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याचा बळी मिळवला, पण अन्वय नाईक व मोहन डेलकर या दोन आत्महत्यांसंदर्भात विरोधी पक्ष काहीच मनापासून बोलायला तयार नाही. मोहन डेलकर हे तर सातवेळा निवडून आलेले खासदार. त्यांनी आत्महत्या केली. संसदेच्या विशेष हक्कभंग समितीसमोर डेलकरांनी सांगितले, दादरा-नगर हवेलीचे प्रशासन माझा अपमान आणि छळ करीत आहे. हे असेच चालू राहिले तर एक दिवस मला आत्महत्या करावी लागेल. डेलकर यांनी ही आत्महत्या मुंबईत येऊन केली. संसदेच्या विशेष हक्कभंग समितीसमोर केलेले निवेदन हाच पुरावा मानून गुन्हेगारांवर कारवाई करायला हवी. ती का होत नाही?, असा सवालही त्यांनी केला आहे.

नव्याने समजले हे बरे झाले

मुकेश अंबानी यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा जीव देशासाठी किती महत्त्वाचा आहे हे देशवासीयांना गेल्या पंधरा दिवसांत नव्याने समजले हे बरे झाले, असा खोचक टोला लगावतानाच एका भल्यापहाटे एक स्कॉर्पिओ गाडी अंबानी यांच्या आलिशान निवासस्थानाच्या परिसरात उभी राहते. त्या गाडीबाबत संशय येऊन पोलीस तेथे पोहोचतात. त्या गाडीत जिलेटिनच्या 20 कांड्या सापडतात. त्यानंतर एका दहशतवादी संघटनेचा धमकीवजा संदेश मिळतो. अंबानी कुटुंबाला मारण्याचा हा कट असल्याचे त्यावर सांगितले गेले. हा कट असेल तर कोणी केला व अंबानी कुटुंबास ठार करण्याचा कट ‘जैश-उल-हिंद’ने का रचावा? 21 जिलेटिनच्या कांड्या व एक स्कॉर्पिओ हा अंबानींसारख्या अतिसुरक्षित व्यक्तीवर हल्ला करण्याचा कट म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

रहस्य आणि सत्य यात फरक

या गाडीचा मालक मनसुख हिरेन हा ठाण्यात राहत होता. त्याने आपली गाडी चोरट्यांनी पळवली अशी तक्रार ही गाडी अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळून आली त्याच्या आठ दिवस आधी म्हणजे 18 फेब्रुवारी रोजी पोलिसांत दाखल केली. विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या मते गाडीचा मालक मनसुख व सचिन वाझे हे चार महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. ज्या मनसुखचा संशयास्पद मृत्यू झाला त्याचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत सापडला हे सर्व प्रकरण म्हणूनच रहस्यमय झाले, पण रहस्य व सत्य यात फरक आहे, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.

फडणवीस शेरलॉक होम्स

यावेळी राऊत यांनी फडणवीसांच्या बौद्धीक चातुर्याचं आणि वकिलीबाण्याचंही कौतुक केलं. फडणवीस यांनी गुप्तहेर शेरलॉक होम्सप्रमाणे या प्रकरणाचा तपास केला व काही गोष्टी समोर आणल्या. एखाद्या निष्णात फौजदारी वकिलाप्रमाणे संपूर्ण केस विधानसभेत मांडली. त्यांचे वकिलीचातुर्य या वेळी वाखाणण्यासारखेच होते, असं कौतुक करतानाच पण फौजदारी वकिलाने खटला कितीही रंगतदार केला तरी न्यायदान हे पुराव्यांवरच केले जाते. मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले, पण हेच पोलीस वर्षभरापूर्वी फडणवीस यांचे हुकूम ऐकत होते. अर्णब गोस्वामीसारख्यांना पोलिसांनी तेव्हा कोणाच्या हुकूमाने वाचविले? फडणवीस यांनी मनसुख प्रकरणाचे नाट्य उत्तम रीतीने उभे केले, पण पुढे काय?, असा सवालही त्यांनी केला.

पोलीस दलातील ‘गटबाजी’ व सौम्य टोळीयुद्ध पुन्हा उसळू लागले तर…

मनसुख हिरेन हा तावडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने बोलावले म्हणून घराबाहेर पडला तो परत आलाच नाही. तावडे नावाचे कुणी अधिकारी मुंबई क्राइम बँचच्या कांदिवली युनिटमध्ये कार्यरत नाहीत हे आता समोर आले आहे. मग या तावडेंच्या फोनचे गौडबंगाल काय? मनसुखचा खून झाला असे त्याची पत्नी सांगते. या सर्व प्रकरणात गुंता आहे. त्या गुंत्यात मुंबई-ठाण्याचे पोलीस व पोलिसांचा एक गट चालवणारी बाह्य शक्ती गुंतली आहे. यातून पोलीस दलातील ‘गटबाजी’ व सौम्य टोळीयुद्ध पुन्हा उसळू लागले तर ते बरे नाही. पोलिसांनी भ्रष्टाचार करावा, पैसे गोळा करावेत, प्रोटेक्शन मनी घ्यावा यात आता काही नवीन राहिलेले नाही. देशभरातील पोलीस दलाची हीच कार्यपद्धती आहे असे लोक गृहीत धरूनच चाललेले असतात, पण पोलिसांत हिंसा, खंडणीखोरी व प्रसंगी अमली पदार्थांच्या व्यवहारातही पैसे मिळविण्याची प्रवृत्ती वाढीस लागली तर देशच संकटात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पोलिसांचे चारित्र्य त्यामुळे बिघडले

एखाद्या खोट्या प्रकरणाचा डोलारा उभा करायचा व त्यात बडी नावे गुंतवून पैसे उकळायचे ही प्रवृत्ती सर्वच स्तरांवर वाढली आहे. पोलिसांचे चारित्र्य त्यामुळे बिघडले. म्हणून मुंबई पोलिसांनी तोंड काळे केले, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले, त्याचे समर्थन कोणीच करू नये. मनसुख हिरेन प्रकरणात पोलिसांनी तोंड काळे केले असा आरोप विरोधी पक्षनेते करीत असतील तर अन्वय नाईक प्रकरणात कोणी तोंड काळे केले व हा कोळसा पोलिसांना पुरवणारे कोण होते?, असा सवालही त्यांनी केला.

अंबानी, हेलिपॅड आणि पटोलेंना सल्ला

”सुरक्षेचे कारण पुढे करून मुकेश अंबानी यांच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले”, असे काँग्रेसचे नेते नाना पटोले म्हणाले. पटोले यांच्याकडे याबाबत पुरावे असतील तर ‘एटीएस’ने आता त्यांचीही चौकशी करावी. अंबानी यांना मुंबईतील घराच्या गच्चीवर हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणासाठी आधीच नाकारली आहे व एकट्या अंबानी परिवारासाठी राष्ट्रीय सुरक्षा पणास लावावी हे शक्य नाही. पुन्हा अंबानीही ते मान्य करणार नाहीत. दुसरे असे की, अंबानी परिवाराने एखादी गोष्ट करायची ठरवलीच तर कोणतेही सरकार त्यास विरोध करणार नाही हेही तितकेच खरे आहे. त्या अंबानी परिवाराच्या नावावर काहीही खपवण्याचा प्रयत्न राजकारणी किंवा पोलिसांनी न केलेला बरा, असा सल्लाही त्यांनी पटोले यांना नाव न घेता दिला आहे.

केंद्राचा राज्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न

अंबानी यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी सापडते. अंबानी यांच्या वैयक्तिक सुरक्षेचे बाजूला ठेवा, पण अंबानी यांना केंद्र आणि राज्य सरकारची सुरक्षा व्यवस्था आहे. तरीही गाडी त्यांच्या घरापर्यंत कशी पोहोचली? असा सवाल पटोले यांनी विधानसभेत केला. गाडी पोलीस सुरक्षा व्यवस्था भेदून पोहोचली, हे त्या सुरक्षा व्यवस्थेचेच अपयश आहे किंवा गाडी पोहोचावी यासाठी त्या दिवशी तेथे विशेष फट ठेवण्यात आली अशी शंका घेतली जाऊ शकते. ‘इझी मनी’ सगळ्यांनाच हवा आहे व त्यासाठी ताळतंत्र सोडायला सगळेच तयार असतात. म्हणूनच मनसुख हिरेन प्रकरणातील सत्य महाराष्ट्र एटीएसने लोकांसमोर आणायला पाहिजे. सरकारने कुणालाही पाठीशी घालू नये. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चोवीस तासांत ‘एनआयए’ला केंद्राने घुसवले ते कशासाठी? केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे म्हणून हे घडू शकले! महाराष्ट्रासारख्या राज्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकण्याचाच हा प्रकार आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. (sanjay raut reaction on mansukh hiren death case )

किणी प्रकरण कोसळून पडले, मनसुखप्रकरणाचेही तेच होईल

अंबानींच्या घराबाहेरील जिलेटिन ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी व त्या गाडीचा मालक मनसुख याच्या रहस्यमय मृत्यूचे प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी बऱ्यापैकी वाजवले. काही दशकांपूर्वी त्यावेळचे विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांनी किणी या इसमाच्या मृत्यूचे प्रकरण असेच रहस्यमय बनविले होते. भुजबळ तेव्हा किणी प्रकरणाचे तपास अधिकारीच झाले होते. किणी या मृताचा मेंदूही चोरण्यात आला असा भन्नाट आरोप करण्यापर्यंत किणी प्रकरण पोहोचले होते. ते प्रकरणसुद्धा पोकळ पुराव्यांवरच उभे होते व शेवटी ते कोसळून पडले. मनसुख प्रकरणाचेही तसेच घडेल, असा दावाही त्यांनी केला. (sanjay raut reaction on mansukh hiren death case )

संबंधित बातम्या:

पवारांना प्रश्न केला वाझे प्रकरणाबद्दल तर ते काय म्हणाले? देशाच्या राजकारणावर बोलले पण वाझेवर?

सचिन वाझेंना निलंबित करणार का?; अनिल देशमुखांचा काढता पाय!

Sachin Vaze Arrested Updates : खरे मारेकरी अजून मोकाट, मनसुख हिरेन यांच्या निकटवर्तीयाची प्रतिक्रिया

(sanjay raut reaction on mansukh hiren death case )

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.