मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील सराईत गुन्हेगारांना फोन केले जात आहेत. या गुंडांशी डील केली जात आहे. त्यांना निवडणुकीपूर्वी बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर वॉच ठेवला पाहिजे, असं धक्कादायक विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या या विधानानंतर मुंबई पोलीस सतर्क झाली आहे. पोलिसांनी राऊत यांना नोटीस बजावून याबाबतची विचारणा केली आहे. परंतु, राऊत यांच्या म्हणण्यानुसार त्यांना अद्याप कोणतीही नोटीस आलेली नाही.
संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना आपल्याला कोणतीही नोटीस आली नसल्याचं म्हटलं आहे. मला नोटीस आली तर पुराव्यासह उत्तर देईन. हे सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालणारं सरकार आहे. तसं नसतं तर भ्रष्टाचाराचे आरोप असलेले, ईडी आणि सीबीआयचे आरोप असलेले लोक तुमचे सहकारी नसते. हे सर्व लोक तुमच्या सरकारमध्ये कसे आहेत? याचाच अर्थ माझ्या बोलण्यता तथ्य आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
तुम्ही गावगुंडांना गोळा केलंच आहे. राहुल कूल, राधाकृष्ण विखेपाटील, दादा भुसे, अब्दुल सत्तार यांची प्रकरणे गंभीर आहेत. ती मी वारंवार दिली आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यांना पाठिशी घातले जात आहे. हे लोक गुन्हेगार नाहीत का? मुख्यमंत्री कार्यालयातून गुंडाना फोन जात नाहीत का? त्याचं उत्तर द्यावं. आधी त्यांना नोटीस पाठवा, मग मला बोला, अशा शब्दात राऊत यांनी फटकारलं आहे. सरकार बनलं हेच एक क्रिमिनल अॅक्ट आहे. अनेक गुन्हेगार या सरकारमध्ये आहेत. जामिनावर सुटलेले, अंतरीम जामिनावरील लोकही या सरकारमध्ये आहे, अशी टीका त्यांनी केली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीतील कळत नाही, सहकारातील कळत नाही आणि अर्थसंकल्पही कळत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या टीकेचाही राऊत यांनी समाचार घेतला.
होय, आम्हाला नॉलेज नहाी. पण खोके देऊन सरकार कसं बनवायचं याचं नॉलेज आम्हाला नाही. भ्रष्टाचार कसा करायचा, त्याचं कसं समर्थन करायचं, ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग करून सरकार बनवणं आणि सरकार पाडण्याचं नॉलेज आम्हाला नाही. विरोधकांना धमकावणं, धाडी मारणं याचं आम्हाला नॉलेज नाही, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.