Sanjay Raut | ‘अजित पवार यांनी माझ्यावर टीका केली की…’, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
अजित पवार यांनी आज दुपारी अखेर प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपल्याबद्दल सुरु असलेल्या विविध चर्चांवर सविस्तर भूमिका मांडली. विशेष म्हणजे अजित पवारांनी स्वत:हून माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडावी, अशी मागणी याआधीच संजय राऊत यांनी केलेली. त्यानंतर अजित पवार यांनी इतर पक्षाच्या प्रवक्त्यांना सुनावलं. अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर येत आपल्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या बंडाबद्दलच्या बातम्यांवर राऊत यांनी ‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरातील लेखात सविस्तर लिहिलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी आज सप्ष्टीकरण दिलं. अजित पवारांच्या या स्पष्टीकरणानंतर संजय राऊत यांनी महाविकास आघाडी आगामी लोकसभेत 48 पैकी 40 जागांवर विजय मिळवेल, असा दावा केला.
“विधानसभेची आता निवडणूक घेतली तर विधानसभेच्या 180 ते 185 जागा मिळतील. तर लोकसभेला आम्हाला 48 पैकी 40 जागा मिळतील. लोकसभेत भाजपचे किमान 110 जागा कमी होतील”, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला. तसेच “अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिल्यामुळे त्यांच्याविषयीच्या ज्या बातम्या हेतू पुरस्पर बातम्या पसरविण्यात आल्या त्यांना अखेर पूर्णविराम मिळालं आहे. महाविकास आघाडीच्या ऐक्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सत्तेतील काही राजकीय पक्षांच्या पायाखालची वाळू सरकतेय. त्यामुळे महाविकास आघाडीत संभ्रम आणि गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय”, असं संजय राऊत म्हणाले.
“शिवसेनेच्या बाबतीत तेच झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीतही तेच घडवत आहेत. काँग्रेसच्या बाबतीतही त्यांचं तेच सुरु आहे, पण तुम्ही आता किती प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीला कोणत्याही प्रकारचा तडा जाणार नाही हे अजित पवार यांनी स्पष्ट आणि परखडपणे सांगितलं आहे. ते महत्त्वाचं आहे”, असं राऊत म्हणाले.
‘अजित पवार यांनी माझ्यावर टीका केली की…’
“अजित पवार यांनी माझ्यावर टीका केली असेल की नाही मला माहिती नाही. पण अजित पवार यांच्याविषयी जी काही बदनामी मोहीम सुरु झाली, त्यावर त्यांनी भूमिका मांडली. जेव्हा शिवसेनेत फुट पाडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार आणि सगळ्यांनीच एक भूमिका घेतली होती. तीच भूमिका आम्ही राष्ट्रवादीच्या बाबतीत घेतली त्यात चुकीचं काय?”, असा सवाल संजय राऊतांनी केला.
“आम्ही सगळे महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. आमच्याविरोधात रोज कारस्थानं होतं आहेत आणि ते उधळणं हे आमच्या सगळ्याचं काम आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष तसेच महाराष्ट्राबाहेरील विरोधी पक्षांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून पक्ष फोडले जात आहे. हे सत्य आहे. त्यात लपवण्यासारखं आहे”, असंही राऊत यावेळी म्हणाले.
‘ऑपरेशन मशालही होऊ शकतं’
“या कारस्थानाविरुद्ध आम्ही सगळ्यांनी एकत्र लढणं गरजेचं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर कसा राजकारणासाठी होतोय याबाद्दल शरद पवार यांनी भूमिका मांडलीय. शरद पवारांनी केंद्रीय गृहमंत्र्यांनाही पत्र पाठवलंय.सध्या कमळाचं सीझन नाहीय. सध्या दुसरी फुलं उगवत आहेत. त्यामुळे बाजारात दुसरी फुलं दिसत आहेत. ऑपरेशन कमळ कशाला? ऑपरेशन मशालही होऊ शकतं. ऑपरेशन घड्याळ किंवा हातही होऊ शकतं. राजकारणात काहीही होऊ शकतं. प्रत्येकाचे दिवस असतात”, असा इशारा राऊतांनी दिला.