Sanjay Raut: छत्रपती घराण्यातील कुणीच राजकीय पक्षात जात नाही हा दावा चुकीचा; राऊतांनी दिले दाखले
Sanjay Raut: संभाजीराजेंच्या राज्यसभेचा विषय आमच्याकडून संपला आहे. संभाजीराजेंना उमेदवारी नाकारली त्यात संजय राऊतांचा काय संबंध आहे? शिवसेनेचा काय संबंध आहे? अशी विधानं करणाऱ्यांनी 15 दिवसांतील घडामोडी पाहिल्या पाहिजे.
मुंबई: स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांच्याऐवजी शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार (sanjay pawar) यांना राज्यसभेची (Rajya Sabha Election) उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मराठा संघटना संतप्त झाल्या आहेत. गादीचे वारस तुमच्याकडे आले होते. तुम्ही त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती, असं मराठा संघटनांनी म्हटलं आहे. तसेच छत्रपती घराण्यातील लोक निवडणुका लढवत नाहीत. त्यांचा सन्मान राखला पाहिजे, असंही काहींचं म्हणणं आहे. त्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती घराण्यातील कुणीच राजकीय पक्षात जात नाही हा दावा चुकीचा आहे, असं सांगत राऊत यांनी छत्रपती घराण्यातील लोक कोणत्या कोणत्या पक्षातून उभे राहिले होते याचे दाखलेच दिले. तसेच देशभरातील राजवंशातील लोक राजकीय पक्षात प्रवेश करून सामाजिक कार्य करत असतात, याकडेही राऊत यांनी लक्ष वेधलं. तसेच स्वत: छत्रपती संभाजीराजे हे राष्ट्रवादीतून लढले होते. तर सीनियर शाहू महाराजांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, अशी माहितीही राऊत यांनी दिली.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. संभाजीराजेंच्या राज्यसभेचा विषय आमच्याकडून संपला आहे. संभाजीराजेंना उमेदवारी नाकारली त्यात संजय राऊतांचा काय संबंध आहे? शिवसेनेचा काय संबंध आहे? अशी विधानं करणाऱ्यांनी 15 दिवसांतील घडामोडी पाहिल्या पाहिजे. घराण्याचा सन्मान राखण्यासाठी आम्ही जागा द्यायला तयार होतो. त्यापेक्षा काय वेगळं करावं? 42 मते आम्ही द्यायला तयार होतो. आमची अट नाही. भूमिका होती. तुम्ही शिवसेनेचं तिकीट घ्या, असं राऊत यांनी सांगितलं.
सीनियर शाहू महाराज शिवसेनेत होते
छत्रपतींच्या घराण्याला राजकीय पक्षाचं वावडं असण्याचं कारण नाही. सीनियर शाहू महाराज आमचे आदरणीय आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढली होती. मालोजीराजे भोसले यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढली आहे. ते आमदार होते. स्वत: संभाजी राजे हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढले आणि पराभूत झाले. त्यामुळे छत्रपतींच्या घराण्यातील कोणी राजकीय पक्षात जात नाही हा त्यांच्या समर्थकांचा दावा चुकीचा आहे. देशभरातील राजवंशाची अनेक घराणे कोणत्या ना कोणत्या पक्षात काम करून आपलं सामाजिक कार्य पुढे नेत असतात. आम्ही 42 मतं देऊन त्यांना राज्यसभेत पाठवण्याचं नक्की झालं होतं. त्यांच्याशी चर्चा झाली होती. त्यांच्या समर्थकांनी घडामोडी समजून घ्याव्यात, असं त्यांनी सांगितलं.
सर्वांनाच नोटीस येईल
शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यातील साडेबारा कोटी जनतेला नोटीस बजवायची बाकी आहे. फक्त भाजप सोडून सर्वांना नोटीस येईल. राज्यातील प्रत्येक लोकांना ईडीची नोटीस बजावली जाईल कारण ते आघाडीचे समर्थक आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
ती आमची संस्कृती नाही
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याचा सत्कार केला. त्यावर राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. तामिळनाडूचं राजकारण काय आहे हे सर्वांना माहीत आहे. राजीव गांधी देशाचे नेते होते. त्यांनी देशासाठी बलिदान दिलं. तामिळनाडूत त्यांची हत्या झाली. राज्याचे मुख्यमंत्री हल्लेखोरांना सन्मानित करत असेल तर ती आमची संस्कृती नाही. आमची नैतिकता नाही. अशाप्रकारचा नवा पायंडा पाडत असेल तर देशासाठी चांगला आदर्श नाही, असं त्यांनी सांगितलं.