अजित पवार आणि निकटवर्तीयांवर छापेमारी, संजय राऊत म्हणतात, अपना भी टाईम आयेगा !
दसरा मेळावा नेहमीच्या पद्धतीने होईल, दसरा मेळावा हा देखील सांस्कृतिक उत्सव आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील ठरवलेला आहे. आम्ही देखील तशी तयारी करत आहोत, असं संजय राऊत म्हणाले
नवी दिल्ली : ही राजकीय छापेमारी असेल किंवा आयकर असेल, सीबीआय असेल, ज्याप्रकारे महाराष्ट्रामध्ये छापेमारी सुरू आहे, हे सुडाचे राजकारण आहे. काय होईल सांगता येत नाही. अजित पवार यांच्यावर राजकीय राग असू शकतो. एखाद्या कुटुंबावर राजकीय कुटुंबावर अशाप्रकारे दहशत निर्माण करणारी छापेमारी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांवर सुरू आहे. हेही दिवस निघून जातील, दिल्लीत आमचेही दिवस येतील, अपना टाईम भी आयेगा, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
“दसरा मेळावा होणारच”
दसरा मेळावा नेहमीच्या पद्धतीने होईल, दसरा मेळावा हा देखील सांस्कृतिक उत्सव आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील ठरवलेला आहे. आम्ही देखील तशी तयारी करत आहोत. दसरा मेळावा होणार, आता हळूहळू कालपासून मंदिरे उघडली आहे. नियम पाळून सण साजरे होत आहे. दसरा मेळावा होईल पण कुठे होणार हे आता सांगू शकत नाही, असं संजय राऊत म्हणाले.
“मुंबईत शिवसेना स्वबळावरच”
शिवसेनेची कायम भूमिका आहे की मुंबईत पक्षाचा विस्तार व्हावा. मुंबईत शिवसेना स्वबळावरच लढत आहे. आम्ही स्वबळावर लढलो, शिवसेना मोठा पक्ष आहे, शंभरीच्या वर जागा, त्याच्या इतक्या जागा आम्हाला मिळाव्यात यासाठी आम्ही नक्कीच तयारी करतोय. पाच वर्षांपूर्वी निवडणूक ही आमच्या ताकदीवर आम्ही जिंकलो, असंही राऊत म्हणाले.
“सोशल मीडियाचा वापर द्वेषाचा आणि सुडाचं राजकारण करण्यासाठी”
संपूर्ण सोशल मीडियाचा वापर द्वेषाचा आणि सुडाचं राजकारण करण्यासाठी केला जातो. आपल्या राजकीय विरोधकांची बदनामी करण्यासाठी केला जातो, जर कोणी आंतरराष्ट्रीय मंचावर आवाज उठवला असेल तर त्याचं समर्थन व्हायला हवं, असंही राऊत म्हणाले.
अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घर-ऑफिसवर छापे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या निकटवर्तीयाच्या नंदूरबारमधील साखर कारखान्यावर धाड मारण्यात आली आहे. आयकर विभागाने काल 12 तास या कारखान्यात झाडाझडती घेतली. त्यानंतर आज सकाळीही छापेमारी सुरू केली आहे. साखर कारखान्याच्याबाहेर मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नंदूरबारमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
पार्थ पवार यांचे निकटवर्तीय सचिन शृंगारे यांचा नंदूरबारच्या समशेरपूर येथे आयान मल्टिट्रेट प्रायव्हेट लिमिटेड हा साखर कारखाना आहे. या कारखान्यावर काल आयकर विभागाने छापा मारला होता. आयकर विभागाचे पाच ते सहा अधिकारी ही तपासणी करत होते. मात्र आयकर विभागाच्या वतीने कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. काल 12 तासाच्या तपासणीनंतर आज सकाळी पुन्हा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीला सुरुवात केली आहे. आयकर विभागाच्या वतीने या प्रकरणात अजून कुठलीही प्रतिक्रिया आली नाहीये. आयकर विभागाच्या हाती काय लागते तपासणी संपल्यावर समोर येणार आहे.
संबंधित बातम्या :
परमबीर सिंग आणि वाझेही जनतेचे सेवकच होते; एनसीबीच्या समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांचा पलटवार