मुंबई : हनुमान चालिसा पठणाच्या मुद्द्यावरुन खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी रान उठवलं होतं. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) अटक करण्यात आलीय. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अशावेळी आपला कोठडीत छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केलाय. आपल्याला शौचास जाण्यास मज्जाव करण्यात आला. मागावर्गीय असल्याने आपल्याला पाणीही दिलं गेलं नाही, असा आरोप करत नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलंय. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडीओ ट्वीट केलाय. पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्याला चहा देण्यात आल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. याच व्हिडीओवरुन संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राणा दाम्पत्य आणि भाजपवर जोरदार टीका केलीय.
राणा दाम्पत्य म्हणतंय की मला पाणी दिलं नाही. मला अस्पृश्य असल्याप्रमाणे वागणूक दिली. त्यांनी आपली जात काढली. खरं म्हणजे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, त्यांचं जातीचं प्रमाणपत्र खोटं आहे. त्यामुळे त्यांची जात कोणती हा तपास करावा लागेल. आज संजय पांडे यांचे या देशाने आभार मानले पाहिजेत, की पोलिसांवर लावण्यात येणारे आरोप कसे खोटे आणि बिनबुडाचे असतात हे त्यांनी प्रत्यक्ष पुराव्यासह दाखवून दिलं. त्यामुळे राज्याचा विरोधी पक्ष उघडा पडला. त्यांनी अत्यंत जबाबदारीने आरोप करायला हवेत. राणा प्रकरणात ते उघडे पडले, किरीट सोमय्या प्रकरणात ते उघडे पडले आणि केंद्राला पत्र लिहित आहेत की महाराष्ट्रावर कारवाई करा म्हणून, अशी टीका संजय राऊत यांनी विरोधकांवर केलीय. गेल्या काही वर्षापासून पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर, पोलिसांवर हल्ले होत आहेत. संजय पांडे हे एक सक्षम अधिकारी आहेत, असंही राऊत यावेळी म्हणाले.
खासदार नवनीत राणा यांना कोणत्याही प्रकारची हीन वागणूक दिली नाही. त्यांचा कोठडीत कोणत्याही प्रकारचा छळ झाला नाही, असं सांगतानाच राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्रं लिहिलं आहे. त्यावर लोकसभा अध्यक्षांनी फॅक्च्युअल रिपोर्ट मागितला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही. लोकसभा अध्यक्षांना याबाबतचा रिपोर्ट पाठवला जाईल, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. मागासवर्गीय असल्यामुळे राणा यांना पाणी दिलं नाही अशी त्यांची तक्रार आहे. या संदर्भात मी चौकशी केली आहे. पण वस्तुस्थिती तशी दिसत नाही. कुणाचं काही म्हणणं असलं तरी पोलीस कायद्यानेच निर्णय घेतात. कारवाई करतात, असंही वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.
दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नागपूर पोलिसांत अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केलीय. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे ही लेखी तक्रार देण्यात आलीय. नागपुरात बोलताना ‘जे पळून गेलेले आहेत आज, त्यांचे बहाणे काहीही असतील. यापुढे जर मातोश्रीच्या नादाला कुणी लागलं, यापुढे शिवसेनेच्या नादाला कुणी लागलं तर त्यांनी आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून यावं. हे मी तुमच्यासमोर कॅमेरासमोर सांगतोय. ही एका शिवसैनिकांची भाषा आहे, हा संताप आहे, राग आहे. मी जे बोलतोय त्याचा परिणाम भोगायला मी तयार आहे’, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. याच वक्तव्याचा आधार घेत नवनित राणा यांच्याकडून नागपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.