‘मी जर मागे लागलो तर मग…!’ मुख्यमंत्र्यांच्या ‘सामना’तील मुलाखतीचा दुसरा प्रोमो रिलीज
या मुलाखतीला ‘अभिनंदन मुलाखत’ असं नाव देण्यात आलं आहे. गुरुवारी सकाळीच या मुलाखतीचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता.
मुंबई : महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा दुसरा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा प्रोमो रिलीज केला आहे. या मुलाखतीला ‘अभिनंदन मुलाखत’ असं नाव देण्यात आलं आहे. गुरुवारी सकाळीच या मुलाखतीचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. (sanjay raut Saamana interview with cm uddhav Thackeray second promo released)
‘मराठी महाराष्ट्रात गाडून त्यावर तुम्ही नाचणार आणि ते आम्ही सहन करू तेही उघड्या डोळ्यांनी, असा संताप व्यक्त करतानाच ज्यांना ज्यांना मुलंबाळं आहेत. त्यांनी आरशात बघावं तुम्हालाही मुलंबाळं आहेत. तुम्हालाही कुटुंब आहे. तुम्ही धुतल्या तांदळासारखे नाहीत. जर मी मागे लागलो तर…, ‘ असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रोमोमधून दिला आहे.
संजय राऊतांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांची परखड मुलाखत घेतली. यामध्ये जीवघेणा कोरोना ते विरोधक अशा मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत. या मुलाखतीच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वाढीव वीजबिल यासंबंधी प्रश्न विचारले गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील अतिशय प्रखरपणे राऊतांच्या प्रश्नांची उत्तरं देताना दिसत आहेत. यामुळे शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या या खास मुलाखतींच्या दोन्ही प्रोमोंमुळे उत्सुकता आणखी वाढली आहे.
महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले? second promo pic.twitter.com/EMKyjB3SNy
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 26, 2020
खरंतर, प्रदर्शित झालेल्या पहिल्या अभिनंदन मुलाखतीच्या प्रोमोमध्ये भाजपला रोखठोक इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ही मुलाखत चांगलीच गाजणार असल्याचे दिसत आहे.
संजय राऊत (प्रश्न) – हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल असे भाकीत करत आलेत?
➡️उद्धव ठाकरे (उत्तर) – असे म्हणणाऱ्यांचे दात पडत आलेत.
संजय राऊत (प्रश्न) – पण दात कसे पाडले तुम्ही?
➡️उद्धव ठाकरे (उत्तर)– सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही 10 सूड काढतो.
संजय राऊत (प्रश्न) – पूर्णपणे, उघडपणे आणि निर्लज्जपणे महाराष्ट्रात अघोरी प्रयोग सुरु आहेत?
➡️उद्धव ठाकरे (उत्तर) – आमच्या आंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत, त्यांना त्यांना सांगू इच्छितो, की तुम्हाला देखील मुलबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाही. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो.
संजय राऊत (प्रश्न)– महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला कसं वाटत? महाराष्ट्र मोठं राज्य आहे, मग महाराष्ट्र हे आत्मनिर्भर कधी होणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा यापलिकडे काय करतात?
➡️उद्धव ठाकरे (उत्तर) – ठिक आहे, हात धुतो आहे , जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन.
संजय राऊत (प्रश्न) – तुमच्या जीवनात वर्षभरात काय बदल झाला ?
➡️उद्धव ठाकरे (उत्तर) – हे विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करु नका. पण विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळते तेव्हा मला जास्त स्फूर्ती मिळते. कोणी कितीही आडवे आले तरी त्यांना आडवे करून महाराष्ट्र पुढे जाईल. (sanjay raut Saamana interview with cm uddhav Thackeray second promo released)
दरम्यान, संजय राऊत यांनी यापूर्वीही उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली होती. त्यानंतर आता महाविकासआघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्तची त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली आहे. सामना या वृत्तपत्रातून ही मुलाखत प्रसिद्ध केली जाणार आहे. उद्या म्हणजेच (27 नोव्हेंबर) ही मुलाखत प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे या मुलाखतीतून मुख्यमंत्री कोणकोणते गौप्यस्फोट करतात, कोणत्या विषयावर भाष्य करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
इतर बातम्या –
आम्ही इंदिरा गांधींचं ऐकलं नाही, तुम्ही कोण आहात? भाजपचा संजय राऊतांवर पलटवार
Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांची वर्षपूर्तीची संजय राऊतांनी घेतलेली मुलाखत लवकरच प्रसिद्ध होणार
(sanjay raut Saamana interview with cm uddhav Thackeray second promo released)