Sanjay Raut : ‘फडणवीसांचे पोलीस इतके सक्षम आहेत की..’, प्रशांत कोरटकरवरुन राऊतांची जिव्हारी लागणारी टीका
Sanjay Raut : "दंगल घडवणारे यांचेच लोक आहेत. आमच्या सराकारच्या काळात कधी दंगली घडल्या नाहीत. मनोहर जोशी, नारायण राणे आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दंगल झाली नाही. शिवसेना फडणवीस सरकारमध्ये एकत्र असताना कधी दंगल घडली नाही. आता कशी दंगल घडू शकते? कोण जबाबदार आहे याला?"

मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रशांत कोरटकरचा एक फोटो व्हायरल झालाय. त्यावरुन तो दुबईला पळून गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. आज खासदार संजय राऊत त्या बद्दल बोलले. “हा विषय महाराष्ट्राच्या गृहखात्याच्या अखत्यारितील आहे. गृहखात हे फडणवीस संभाळतात, जे या देशातलं एक महान व्यक्तीमत्व आहे. त्यांच्याइतकं महान नेतृत्व अजून निर्माण झालेलं नाही, असं त्यांच्या अलीकडच्या वक्तव्यांवरुन दिसतं. प्रशांत कोरटकर हा नागपूरचा आहे. दंगल नागपूरला होते” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “फडणवीसांच संपूर्ण सरकार हे मनोरुग्णांच सरकार आहे. त्या सरकारवर सामुदायिक मानसोपचार करण्याची गरज आहे. प्रशांत कोरटकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे. पळून गेला की नाही हे तेच सांगितलं” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
“उद्या कोरटकर भाजपच्या कार्यालयात, एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात किंवा वर्षा बंगल्यावर सापडू शकतो. भाजपच्या राजवटीत काहीही होऊ शकतं. खरोखर प्रशांत कोरटकर पळून गेला असेल, तर तो गृहखात्याच्या मदतीशिवाय पलायन करु शकत नाही. फडणवीसांचे पोलीस इतके सक्षम आहेत की, विरोधकांना बरोबर पकडतात. कृष्णा आंधळे त्यांना सापडत नाही. अजून काही भाजपशी संबंधित आरोपी सापडत नाहीत. म्हणून हे संपूर्ण सरकार मनोरुग्णांच सरकार आहे. त्यांना उपचाराची गरज आहे” अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
‘गृहमंत्री हवेत पतंग उडवत आहेत’
“कोणताही आरोपी ज्याला जामिन नाकारलेला आहे, जामीन फेटाळलेला आहे, ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रात केलाय. नागपूर पोलीस, दंगलीचे आरोपी पकडले म्हणून रोज पत्रकार परिषदा घेतात, पण ज्याला खरोखर पकडायचा होता, तो पळून गेला. ज्या दिवशी कोरटकरला हाय कोर्टाने जामिन नाकारला, त्या दिवशी तो नागपूरमध्येच होता. ही नागपूर पोलिसांची जबाबदारी आहे. तो जर पळून गेला असेल, नागपूर पोलीस आयुक्तांचा राजीनामा घेतला पाहिजे, त्यांची बदली केली पाहिजे. गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. पण गृहमंत्री हवेत पतंग उडवत आहेत. त्यांची पतंग फाटली आहे, भरकटली आहे” अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
‘चिल्ली-पिल्ली लोकांवर कारवाई केली’
“औरंगजेबाची कबर उखडा म्हणणारे लोक तुमचे आहेत. त्याच्या कारवाई करताय का? दंगलीला खतपाणी घालणेर लोक तुमच्या कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत. वातावरण पेटवणारे लोक तुमच्या बाजूला बसले आहेत, कोणावर कारवाई केली तुम्ही? चिल्ली-पिल्ली लोकांवर कारवाई केली, हे अख्ख सरकार मानसिक दृष्ट्या भ्रष्ट, विकलांग झालं आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.