मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत बिनधास्तपणे विधाने करत असल्याने त्यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. भाजपापसून ते बंडखोर आमदारांपर्यंत सर्वच जण राऊतांच्या या बिनधास्त बोलण्यावर खट्टू आहेत. आता शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनीही राऊत यांना संयमाचा सल्ला दिला आहे. राऊत त्याचं काम करत आहेत. ते भाजपलाही त्याच पद्धतीने बोलायचे. त्यांची ती शैली आहे. ते बिनधास्त बोलत असतात. त्यामागे त्यांचा हेतू फक्त शिवसेनेला सपोर्ट करायचा असतो. पण राऊतांनीही शांतता घ्यावी आणि त्यांनीच पुढाकार घेऊन दोन्ही नेत्यांना एकत्रित आणावं, असं आवाहन दिपाली सय्यद यांनी (Deepali Sayed) केलं. दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भावना व्यक्त केली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची येत्या दोन दिवसात भेट होणार असल्याचा दावाही सय्यद यांनी केला.
माझ्या मनातील इच्छा ट्विटच्या माध्यमातून मांडत असते. या दरम्यान मी ज्या भेटीगाठी घेतल्या त्यातून जे जाणवलं ते मी ट्विटमध्ये मांडलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही भेटले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटले. दोन्हीकडच्या आमदारांनाही भेटले. या सर्वांना शिवसेनेत फूट नको होती. त्यांच्या बोलण्यातून जे जाणवलं तेच मी ट्विटच्या माध्यमातून मांडलं आहे. दोन गट नसावेत म्हणून मी ट्विट केलं. प्रत्येकाला एकत्रं यायचं आहे. पण मानअपमानाची भावना प्रत्येकाच्या मनात आहे, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.
दिपाली सय्यद यांना जपून बोलण्याचा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर दिपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रत्येक शिवसैनिकाला बोलण्याचा अधिकार आहे. म्हणून मी बोलत असते. तुटलेलं घर एकत्रं यावं असं वाटलं म्हणून बोलले. ते बोलण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही, असा टोला त्यांनी राऊत यांना लगावला. माझ्यावर कारवाईचा प्रश्नच येत नाही. कारण मी फक्त मध्यस्थीची भूमिका पार पाडत आहे. तशी भावना व्यक्त करत आहे. ते लोक मोठे आहेत. ते आज वेगळे आहेत ते उद्या एकत्रं येतील. त्यांनी बोलावं. तरच ते एकत्र येतील, असं त्या म्हणाल्या.
सर्वांनाच सांगते, त्यांनी बोलावं. दीपक केसरकर आणि शहाजी बापू पाटील यांच्याशी बोलले. या सर्वांना एकत्रं यायचं आहे. पण कुणी पुढाकार घेत नाही. मान अपमानात हे सर्व अडकलं आहे. कुठे तरी इगो आड येत आहे. दोघांनीही इगो बाजूला ठेवून चर्चा करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
उद्धव ठाकरे हे आमचे प्रमुख नेते आहेत. ते जबाबदार नेते आहेत. त्यांच्याकडे आम्ही वडीलधारे म्हणूनच पाहतो. त्यांनी सर्वांना सांगितलं की मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत. ते हाक मारत आहेत. साहेबांनी बोलावलं आहे. त्यामुळे बंडखोरांनी यावं. शिंदे गटाकडून कोणी बोलत नाही. कुठे तरी काही गोष्टी अडत आहेत. त्या तोडण्याचा माझा प्रयत्न दिसेल, असं त्या म्हणाल्या.