‘गिरीश महाजन असही म्हणतील, लैंगिक अत्याचार झाला त्या मुली….’, संजय राऊतांची टीका
"बलात्कार जसा अबलेवर होतो, तसा राज्य घटनेवर सुद्धा होतो, महाराष्ट्रात सरकार राज्य घटनेवर बलात्कार करुन निर्माण झालय. हा खटला त्यांना फास्ट ट्रॅकवर नकोय. त्यांच्या तोंडी फास्ट ट्रॅकची भाषा शोभत नाही" अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“महाराष्ट्रात घटनाबाह्य अघोरी पद्धतीने सत्तेवर आलेलं सरकार आहे. त्यांच्याकडे माणुसकी, भावना या गोष्टी त्यांच्याकडे असतील हे अजिबात संभवत नाही. बदलापुर ज्या शाळेत ही घटना घडली, ती शाळा भाजपाशी संबंधित आहे. दुर्देवाने ती शाळा दुसऱ्या कुठल्या पक्षाशी संबंधित असती तर फडणवीस आणि त्यांचं महिला मंडळ हे त्या शाळेच्या पायरीवर जाऊन बोंबा मारत बसलं असतं” अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. “योगाींच जे राज्य सुरु आहे, बुलडोझर राज्य. काही ठिकाणी अशा गुन्ह्यानंतर बुलडोझर चालवण्याच काम मिंधे सरकारने केलं. मग हे बुलडोझर बदलापूरला का गेले नाहीत? हा प्रश्न आहे. या पूर्वी अशा गुन्ह्यात जरब बसावी, म्हणून बुलडोझर चालवले” असं संजय राऊत म्हणाले.
“जनतेचा काल उद्रेक होता. याला पब्लिक क्राय म्हणतात. अशा पब्लिक क्रायची दखल न्यायालयाने घेतली आहे. मग कालच्या पब्लिक क्रायची दखल सर्वोच्च न्यायालयाने का घेतली नाही? कोलकाता घटनेची दखल सर्वोच्च न्यायालय घेतं, कारण तिथे ममता बॅनर्जींच सरकार आहे. इथे पब्लिक क्राय कोलकत्यापेक्षा जास्त होता. पण चिमुकलीचा आक्रोश न्यायालयाच्या कानाचे पडदे फाडू शकला नाही” असं संजय राऊत न्याय व्यवस्थेबद्दल बोलले.
‘एसआयटी शब्द फडणवीसांच्या तोंडात शोभत नाही’
“फडणवीसांनी एसआयटी स्थापनेची घोषणा केली. काय गरज आहे? आरोपी पकडला आहे. पोलिसांनी तपास केलाय. एसआयटी शब्द फडणवीसांच्या तोंडात शोभत नाही. ठाकरे सरकारने ज्या एसआयटीची स्थापना केलेली, फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर 24 तासांच्या आत फडणवीसांनी सर्व एसआयटी रद्द केल्या. तुम्ही एसआयटी मानत नाहीत” असं संजय राऊत म्हणालेत.
‘महाराष्ट्रात सरकार राज्य घटनेवर बलात्कार करुन निर्माण झालय’
“मिंधे मुख्यमंत्र्यांनी फास्ट ट्रॅकवर खटला चालेल असं म्हटलं. या घटनाबाह्य सरकारचा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे. तिथे हे सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणून तारखांवर तारखा पाडून घेतायत. बलात्कार जसा अबलेवर होतो, तसा राज्य घटनेवर सुद्धा होतो, महाराष्ट्रात सरकार राज्य घटनेवर बलात्कार करुन निर्माण झालय. हा खटला त्यांना फास्ट ट्रॅकवर नकोय. त्यांच्या तोंडी फास्ट ट्रॅकची भाषा शोभत नाही” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
‘गिरीश महाजन यांचं डोकं फिरलय’
गिरीश महाजन म्हणतात, विरोधकांनी काही माणसं गर्दीत घुसवली, त्यांनी गोंधळ घातला, या आरोपावर उत्तर देताना संजय राऊत असं म्हणाले की, “गिरीश महाजन असं सुद्धा म्हणतील, ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाला, त्या चिमुरड्या मुली विरोधकांच्या असतील, त्यांना मॅनेज केलं असेल, गिरीश महाजन यांचं डोकं फिरलय. अशा विषयात राजकारण करु नये. यात विरोधकांचा काय संबंध, त्या मुली किती लहान आहेत. पोलीस तक्रार नोंदवून घेत नव्हते, पोलिसांवर दबाव येत होता, त्यावर तुम्ही का बोलत नाही?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.