Sanjay Raut : जोपर्यंत खोतकर स्वत:हून सांगत नाहीत, तोपर्यंत ते शिवसेनेतच, खोतकरांचे दानवेंबाबतचे शब्द सांगूच शकत नाही: संजय राऊत
Sanjay Raut : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी होत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सोनिया गांधी यांचं वय 75 आहे. त्या आजारी आहेत. तरीही त्या ईडीचं समन्स आल्याने चौकशीला गेल्या. पण हे राज्यकर्त्यांना शोभा देत नाही.
मुंबई: शिवसेनेचे मराठवाड्यातील मोठे नेते अर्जुन खोतकर (arjun khotkar) हे शिंदे गटात जाण्याची चर्चा आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने खोतकर यांचा शिंदेंना पाठिंबा असल्याचं जाहीर करून टाकलं आहे. त्यामुळे खोतकर शिंदे गटात गेल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं विधान केलं आहे. दोन दिवसांपूर्वीच माझं अर्जुन खोतकर यांच्याशी बोलणं झालं. यावेळी त्यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांच्यावर टीका केली होती. दानवेंना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं ते म्हणाले होते. दानवेंबाबत त्यांनी आणखी काही शब्द वापरले होते. ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, असं सांगतानाच जोपर्यंत खोतकर स्वत:हून सांगत नाहीत. तोपर्यंत ते शिवसेनेतच आहेत. त्यांनीच याबाबत बोललं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.
दोन दिवसांपूर्वीच अर्जुन खोतकर यांच्याशी मी चर्चा केली होती. ते मला म्हणाले होते रावसाहेब दानवेंना गाडल्याशिवाय मी राहणार नाही. लोकसभा निवडणुकीत उभा राहीन आणि दानवेंना घरी बसवेल असं ते म्हणाले होते. खोतकर यांचे काही शब्द सांगू शकत नाही. शिवसेनेच्या व्यासपीठावरील खोतकर यांची तुम्ही भाषणं ऐकली तर मला वाटतं काही तरी गैरसमज झाला असावा. खोतकर शिवसेनेत आहेत. ते स्वत:हून सांगत नाहीत, तोपर्यंत ते सेनेत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
हे राज्यकर्त्यांना शोभणारं नाही
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी होत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सोनिया गांधी यांचं वय 75 आहे. त्या आजारी आहेत. तरीही त्या ईडीचं समन्स आल्याने चौकशीला गेल्या. पण हे राज्यकर्त्यांना शोभा देत नाही. त्यांची घरी जाऊन चौकशी केली असती. हे अमानुष आहे. नॅशनल हेराल्डला एक इतिहास आहे. ही संस्था वाचवण्यासाठी काँग्रेसने किंवा गांधी कुटुंबाने काही प्रयत्न केले असतील तर त्यांना सरकारने पाठिंबा द्यायला हवा. पण त्यातही मनी लॉन्ड्रिंग दिसत असेल तर चुकीचं आहे. देशातील विरोधी पक्ष, नेते, पत्रकार यांचा छळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते लोकशाहीला आणि देशाच्या स्वातंत्र्याला आणि देशाच्या अस्तित्वाला मारक आहे, असं ते म्हणाले.
पण मी पक्ष सोडणार नाही
राऊत यांनाही ईडीने समन्स बजावला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी चौकशीला सामोरे जाईल. माझी डोळ्यात डोळे घालून बोलण्याची माझी हिंमत आहे. पण मी माझा पक्ष सोडणार नाही. संसदेचं अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे अधिवेशन काळात चौकशीपासून सूट देण्याची विनंती ईडीला केली आहे. त्यांनी मान्य केलं तर चांगलं आहे, असंही ते म्हणाले.