Sanjay Raut : ठाकरे कुटुंबाच्या पाठित खंजीर खुपसला त्यांचं वाटोळं झालं; संजय राऊतांचा तळतळाट
Sanjay Raut : भाजपनं अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला पाळला नाही. तो राहिला नाही. त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. भाजपने शब्द पाळला असता तर आज शिंदेच मुख्यमंत्री झाले असते.
अलिबाग: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी केलेल्या बंडावर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी तोंडसुख घेतलं आहे. शिवसेनेच्या (shivsena) अंगावर यायची हिंमत कराल तर बघा. आता त्यांना फटके देण्याची वेळ आली आहे. रस्त्यावर असे गद्दार फिरता कामा नयेत. रस्त्यावर त्यांना उघडं करुन मारा, असं विधान करतानाच बंडखोरांपैकी अनेक जण राष्ट्रवादीतून आलेले आहेत. ठाकरेंच्या परिवारात खंजीर खुपसला त्याचं वाटोळं झालं. शिवसेनेत श्रद्धेला, निष्ठेला किंमत आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत हे अलिबाग येथे शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी अब्दुल सत्तार आणि भरत गोगावले यांच्यावर जोरदार टीका केली. भरत गोगावले आनंद दिघेंची एक्टिंग करतात. त्यांनी कधी दिघेंना पाहिलं काय? हिंदुत्वाचं तुम्ही सांगता आम्हाला? अब्दुल सत्तार यांचं हिंदुत्व कसं धोक्यात आलं? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
भाजपनं अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला पाळला नाही. तो राहिला नाही. त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. भाजपने शब्द पाळला असता तर आज शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. उद्धव ठाकरे यांच्या मनात शिंदे यांचंच नाव होतं, असं सांगतानाच ज्या भाजपाने हे घडू दिले नाही, त्याच्या मांडीला मांडी लावून बसलात. तुम्हाला हवं तर मविआ सरकारमधून बाहेर पडू. पण तुम्ही इथे या. तुम्ही इथे येवू शकत नाही, कारण तुम्ही कैदेत आहात. तुम्हाला तिकडे गुलाम बनवून ठेवले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
नामांतराचं स्वागत
नवी मुंबईच्या विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्याचं राऊत यांनी स्वागत केलं. नवी मुंबई विमानतळाच्या नावाचे स्वागत करतो. दि. बा. पाटील हे एका जातीपुरते नव्हते, ते मोठे होते, असंही त्यांनी सांगितलं.
आपल्याला करेक्ट कार्यक्रम करायचा आहे
आपल्याला करेक्ट कार्यक्रम करायचा आहे. मुंबईतून मीडियावाले आलेत, त्यांना वाटत होतं ईडीवाले अटक करतील. तुम्ही कितीही काहीही करा, मी गुवाहटीला जाणार नाही. बंडखोर गुवाहटीत जेलमध्ये जाऊन बसले आहेत. मी जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.