पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिभेला मौनाचा आजार का जडला?; संजय राऊत यांची ‘रोखठोक’मधून भाजपवर जहरी टीका
सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेच्या केलेल्या गौप्यस्फोटावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदी पुलवामाच्या घटनेवर का बोलत नाहीत? त्यांच्या जिभेला मौनाच आजार झालाय का? अशी टीका राऊत यांनी केली आहे.
मुंबई : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू काश्मीरमधील वास्तव जगासमोर आणलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बेपर्वाईमुळेच पुलवामामध्ये जवानांचा बळी गेल्याचा दावाही केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपला घेरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मौनी बाबा का झाला? त्यांच्या जिभेला मौनाचा आजार का जडला? असा सवाल संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ या सदरातून केला आहे. तसेच खारघर प्रकरणातही मिटवामिटवी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी मृतांच्या घरी आणि रुग्णालयात पैसे देण्यासाठी कोण गेले होते? असा सवाल करतानाच या प्रकरणाची गृहमंत्री फडणवीस यांनी चौकशी करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांचे ‘रोखठोक’ जसेच्या तसे
- नवी मुंबईतील खारघर येथे 14 साधकांचे बळी गेले. सरकारने उकळत्या उन्हात घेतलेले हे बळी. ‘पुलवामा’ हल्ल्यात 2019 साली 40 जवानांचे बळी सरकारी कृपेने गेले याचा स्फोट आता जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला. ‘पुलवामा’ बळी हेसुद्धा सदोष मनुष्यवध आणि पालघरच्या तीन साधूंची हत्या म्हणजेही सदोष मनुष्यवधच! मग वेगवेगळा न्याय का?
- ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार सोहळा भरदुपारी रणरणत्या उन्हात पार पडला. राजकारणी, श्रीमंतांच्या खाशा स्वाऱ्यांसाठी थंड मंडप आणि सावलीतले व्यासपीठ उभे केले आणि लाखोंचा जनसागर उन्हात. त्यात मुले, महिला, वृद्ध वगैरे 42 डिग्री तापमानात उघड्यावर होते. पुन्हा श्रीमंतांची भाषणे लांबत गेली आणि उष्माघाताने व चेंगराचेंगरीने 14 जिवांचे बळी गेले. हा आकडा खरा नाही. 14 निरपराध्यांच्या मृत्यूबद्दल सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सरकारवर का दाखल होऊ नये? हा सरळ प्रश्न आहे.
- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पालघरला जमावाकडून तीन साधूंचे हत्याकांड झाले. त्यामुळे ठाकरेंच्या राज्यात हिंदुत्वाची हत्या झाली अशी बोंब देशभरात मारून एक वातावरण निर्माण केले गेले. विरोधी पक्षनेते तेव्हा देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांनी साधूंच्या हत्येबद्दल सरकारला जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली.
- डहाणूच्या गडचिंचले गावात जेथे साधू मारले गेले तेथे फडणवीस यांच्यासह संपूर्ण भाजपची जत्राच उसळली होती, पण आता खारघरमध्ये जे 14 ‘श्री सेवक’ मारले गेले ते झुंडीचेच बळी होते. हे 14 जण हिंदुत्वाच्या कार्यासाठीच खारघरला आले होते आणि सरकारी बेफिकिरीचे बळी ठरले. मात्र या हत्याकांडावरफडणवीस आणि त्यांच्या भाजपची संपूर्ण ‘तीर्थयात्रा’ गप्प आहे. 14 हिंदू धार्मिक कार्पामात मारले गेले. हे सर्व प्रकरण पैसे वाटून मिटवण्यासाठी इस्पितळात व मृतांच्या घरी कोणाचे लोक पोहोचले? गृहमंत्री फडणवीस, कृपया चौकशी करा!
- पुलवामा हल्ला हा सरकार प्रायोजित होता काय? 2019 च्या निवडणुका जिंकता याव्यात यासाठी सुनियोजित पद्धतीने रचलेले हे राजकीय षङयंत्र होते काय? अशा शंका आता उघड झाल्या आहेत. सत्यपाल मलिक यांना तोंड बंद ठेवण्यास सांगितले गेले, पण ‘पुलवामा’ पद्धतीचा हल्ला होण्याची दाट शक्यता आहे असा अंदाज गुप्तचर खात्याने दिला होता.
- गुप्तचरांनी सरकारला दिलेली माहिती खरी ठरली. तेच जैश-ए-मोहम्मदबद्दल. त्यांच्याद्वारे त्याच मुदस्सीर खानच्या नेतृत्वाखाली त्याच पुलवामा, अवंतीपोरा भागात आयईडी स्फोट घडवून 40 जवानांची हत्या केली. हे असेच घडेल याची खबर जशीच्या तशी ‘आयबी’ने गृह मंत्रालयास कळवली होती. सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले आणि 40 जवान प्राणास मुकले. राष्ट्रद्रोह आणि सदोष मनुष्यवध यालाच म्हणतात.
- आपले पंतप्रधान मोदी नोटाबंदीच्या अपयशावर आणि रांगेतल्या शेकडो बळींवर बोलत नाहीत, मोदी अदानींच्या घोटाळ्यावर बोलत नाहीत आणि जे मोदी सर्जिकल स्ट्राइकच्या फटाकेबाजीवर जाहीर सभांतून बोलत राहिले, ते मोदी पुलवामाच्या निर्घृण हत्याकांडावर सत्यपाल मलिक यांनी जो स्फोट केला, त्यावरही बोलत नाहीत! मोदी यांचा मौनी बाबा नक्की का झाला? त्यांच्या जिभेला असा मौनाचा आजार का जडला? लोक मरोत, जगोत, सैनिक बॉम्बस्फोटांत मरोत, लोक चिरडून मरोत, आम्हाला काय त्याचे? सरकार त्याच भूमिकेत आहे!
हे सुद्धा वाचा